नागरीकरणाच्या आघाडीवर मुंबईशी जोरदार स्पर्धा करू पाहणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरांना एकमेकांशी जोडू पाहणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हे नवे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर ही सर्वच शहरे वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. अरुंद रस्ते, जागोजागी झालेली बेकायदा बांधकामे, नियोजनाचा अभाव यामुळे या शहरांमधून प्रवास अक्षरश नकोसा झाला आहे. या प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडणारे मार्गही नागरीकरणाच्या वेगात अपुरे ठरू लागले आहेत. मुंबई स्कॉयवॉकसारखे प्रकल्प राबविण्यात गर्क असलेल्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणानेही इतकी वर्षे महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांकडे कानाडोळा केला. त्याचे विपरीत परिणाम आता या सगळ्या पट्टय़ावर दिसू लागले आहेत. यातून बोध घेत राज्य सरकारने एमएमआरडीए, राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या सर्व पट्टय़ात रस्ते, उड्डाणपुलांचे मोठे जाळे उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाणपुलाचा शुभारंभ होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगर क्षेत्रातील ठाणे आणि आसपासच्या परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाचे महत्त्व विशद करताच संबंधित प्राधिकरणांनी नव्या वर्षांत विकासाचा केंद्रिबदू ठाणे हाच ठेवला आहे.
ठाणे आणि आसपासच्या शहरांची लोकसंख्या आता ५० लाखांचा आकडा ओलांडू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारला उशिरा का होईना या पट्टय़ात युद्धपातळीवर रस्ते, उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मुंबई-ठाणे-वसई-विरार यांसारख्या महत्त्वाच्या भागांना एकमेकांशी जोडणाऱ्या घोडबंदर मार्गावर उन्नत मार्गाची उभारणी होऊ शकते का याची चाचपणी राज्य रस्ते विकास महामंडळाने नव्याने सुरू केली आहे. या मार्गावरील सद्य:स्थितीत उभारण्यात आलेले उड्डाणपूलही आता तोकडे पडू लागले आहेत. घोडबंदरप्रमाणे कल्याण-शीळ रस्त्यावरही वाहनांची संख्या तिपटीने वाढली आहे. नवी मुंबई-ठाणे-कल्याण-डोंबिवली अशा प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडणाऱ्या या रस्त्यालगत मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. या मार्गावर तब्बल तीन ठिकाणी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाणपुलांची उभारणी होणार आहे. या मार्गावरीलही उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी मांडला आहे. ठाणे-डोंबिवली हा प्रवास ३० ते ३५ मिनिटांत शक्य व्हावा यासाठी उभारण्यात येणाऱ्या माणकोली उड्डाणपुलाची निविदा एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीपुढे येत्या ८ जानेवारी रोजी मंजुरीसाठी येत आहे. भिवंडी-कल्याण-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर उल्हास खाडीवर दुर्गाडी किल्ल्याजवळ सहा पदरी उड्डाणपुल उभारण्याची निविदाही अंतिम टप्प्यात आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक वेगवान व्हावी आणि या संपूर्ण क्षेत्राच्या एकत्रित विकासासाठी ती फलदायी ठरावी यासाठी हे सर्व प्रकल्प निर्णायक भूमिका बजावू शकणार आहेत.

कळवा खाडीवर नवा पूल
ठाणे आणि कळवा-मुंब्रा शहराला जोडणारे दोन पूल खाडीवर आहेत. त्यामध्ये सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल आणि या पुलाशेजारीच २० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला दुसरा पुल यांचा समावेश आहे. ठाण्यातून नवी मुंबई, कोकण, पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी ठाणे-बेलापूर रस्ता सोयीचा ठरतो. याशिवाय, नवी मुंबई, मुंब्रा भागांत जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. या वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने हे पूल वाहतूकीसाठी कमी पडू लागले आहेत. असे असतानाच सप्टेंबर २०१० रोजी ब्रिटिशकालीन पुलाच्या कमानीचे काही दगड निखळून पडले. तसेच त्या पुलाचे आयुर्मानही संपले. यामुळे खाडीवरील दुसऱ्या पुलावर मोठा ताण येऊ लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी कळवा खाडीवर साकेतकडील बाजूस तिसरा नवा पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या कामासाठी सुमारे १८० कोटी रुपयांचा खर्च येणार असून हे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नियोजित पूल हा उत्तरेकडील साकेत बाजूस बांधून त्यास ठाण्याकडील बाजूस तीन रस्त्यांवरून अप रॅम्प देण्यात येणार आहे. तसेच खाडी ओलांडल्यावर पुलाची एक मार्गिका कळवा शिवाजी चौकात व दुसरी मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून या पुलाचे कामही सुरू झाले आहे.

कोपरीतील रस्त्याचे रुंदीकरण..
ठाणे शहराला भेदून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर कोपरी उड्डाणपुलामुळे कोंडी होत आहे. हा महामार्ग चारपदरी असला तरी ज्ञानसाधना महाविद्यलयालगत असलेला कोपरी पुलाचा रस्ता दुपदरी आणि चिंचोळा आहे. यामुळे या भागात वाहनांचा वेग कमी होतो आणि वाहतूक संथगतीने होऊन वाहतूक कोंडी होते. परिणामी, तीनहात नाका तसेच आनंदनगर भागात वाहनांच्या रांगा लागतात. या पाश्र्वभूमीवर या पुलाच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून हे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचबरोबर भास्कर कॉलनीसाठी ज्ञानसाधना महाविद्यलयाकडून एक सब-वेही काढण्यात येणार आहे. यामुळे तीनहात नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवाशांचा मुंबईकडे जाण्याचा वेळ वाचणार आहे.

खारेगाव रेल्वे मार्गावर उड्डाणपूल
खारेगाव येथील मध्य रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाला मध्य रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. या पुलाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे हद्दीबाहेरील पुलाच्या जोडरस्त्याचे काम महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे ५० लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या उड्डाणपुलामुळे रेल्वे वाहतुकीला बांध बसणार नाही आणि खारेगाव परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. या कामाची गरज लक्षात घेऊन प्रकल्पास मान्यताही देण्यात आली आहे. या पुलाच्या उभारणीचे कामही सुरू झाले असून त्यासाठी दोन खांब (पिलर) उभारणी करण्यात आली आहे. यामुळे येत्या वर्षभरात या पुलाचे काम मार्गी लागण्याची शक्यता असल्याने खारेगाववासीयांची कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत.

कळवा समांतर रस्ता
ठाणे शहरातून नवी मुंबई किंवा मुंब्रा-दिवा तसेच डोंबिवली भागात जाणारी अनेक वाहने कळवा नाका येथून जातात. तसेच या नाक्यावरून अवजड वाहनेही जात असतात. यामुळे कळवा नाका वाहतूक कोंडीचे आगर बनू लागले असून ही कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर कळवा नाका ते खारेगाव रेतीबंदपर्यंत समांतर रस्ता तयार करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला होता. या रस्त्याच्या कामासाठी सर्वेक्षणही करण्यात आले. या कामासाठी सुमारे १४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांत महापालिकेची आर्थिक परिस्थिती कोलमडल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कामाचा खर्च पेलवणे शक्य नाही. कळवा नाक्यावरील वाहतुकीचा भार कमी व्हावा यासाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे महापालिकेने या रस्त्याच्या बांधणीसाठी एमएमआरडीएकडे निधीची मागणी केली असून त्यासंबंधीचा प्रस्तावही त्यांना पाठविला आहे.

तीन उड्डाणपूल..
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने नौपाडा, अल्मेडा चौक, मीनाताई ठाकरे चौकात तीन उड्डाणपुलांच्या उभारणीचा निर्णय घेतला असून त्यासाठी सुमारे २२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नौपाडा पोलीस ठाणे ते जिजामाता उद्यान, मखमली तलाव ते वंदना सिनेमागृह, गोकुळनगर ते सिद्धी हॉल असे हे तीन पूल असणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या पुलांची कामे सुरू झाली आहेत. या पुलांची कामे सुरू करण्याआधी स्लीप रोड तयार करणे, खांब उभारणीसाठी मातीचा दर्जा तपासणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर पूल बांधणीसाठी खांब उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. नौपाडा येथील उड्डाणपुलामुळे गोखले मार्गावरील वाहतुकीची समस्या काहीशी कमी होणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. येत्या काही वर्षांत या पुलांची उभारणी होण्याची शक्यता आहे.

कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडीजवळ सहापदरी पूल
कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दुर्गाडी पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असून या पुलाला शहरातील विविध बाजूंनी येणारे दुपदरी आणि चौपदरी रस्ते मिळतात. त्यामुळे या पुलावर वाहतूक कोंडी निर्माण होते. याची झळ कल्याण शहराला बसत आहे. त्यामुळे हा रस्ता सहापदरी करण्याची मागणी केली जात होती. या सहापदरी पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. कल्याणचे प्रवेशद्वार असलेल्या कल्याण दुर्गाडी पुलावरून भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग हा मुरबाडमार्गे जाणारा रस्ता, पुणे-नवी मुंबई रस्ता, भिवंडी रस्ता, भविष्यात पूर्ण होणारा गोविंदवाडी बायपास हे रस्ते जोडले जात आहेत. मात्र हा पूल दुपदरी असल्याने या पुलावर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे दुर्गाडी खाडीवर पर्यायी पूल बांधण्याची मागणी केली जात होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या निधीतून या परिसरामध्ये सहापदरी पूल उभारण्यात येणार असून त्याला सुमारे ७६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी लागणारी जागा महापालिकेने हस्तांतरित केली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

वंजारपट्टी उड्डाणपूल
भिवंडी वाडा आणि नाशिक रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना वंजारपट्टी नाका येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे उड्डाणपुलाची बांधणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. ७८५ मीटर लांबीच्या या उड्डाणपुलामुळे भिवंडीतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊ शकणार आहे. वंजारपट्टी उड्डाणपुलाला एकीकडे नाशिककडे जाणारा महामार्ग आणि तर दुसरीकडे शिवाजी चौकाकडे जाण्यासाठी दोन मार्गिका आहेत. यामुळे नाशिक आणि वाडाच्या दिशेने जाणारी वाहतूक सुलभतेने होणार असून या भागातील उद्योग व्यवसायांनादेखील याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे. भिवंडीतून ये-जा करण्यासाठी लागणारा सव्वा ते दीड तासाचा कालावधी अवघा अध्र्या तासावर आला आहे. तसेच हा प्रवास कोणत्याही गतिरोधक अथवा सिग्नलविना पार पडत आहे. त्यामुळे कोटय़वधी रुपयांच्या इंधनाचीही बचत होत आहे.

राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिरापर्यंत उड्डाणपूल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी भिवंडीतून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या तीन उड्डाणपुलांच्या कामांचे भूमिपूजन केले. यापैकी राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर हा उड्डाणपूल विशेष महत्त्वाचा ठरतो. राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर हा भिवंडी ते कल्याण रस्त्यावरील हा उड्डाणपूल तीन किमी लांबीचा असून या पुलावरून कल्याणहून भिवंडीला तर भिवंडीहून कल्याणला जाता येईल अशा दोन मार्गिका आहेत. यासाठी १५० कोटी रुपये खर्च येणार असून ३० महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

भिवंडीतील रस्ते सुधारणार
कांजूरफाटा ते वंजारपट्टी या भिवंडीतील प्रमुख मार्गाचे काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिल्या आहेत.
भिवंडीतील अंतर्गत रस्ते सुधारण्यासाठी स्थानिक आमदारांना १० कोटी रुपयांच्या तरतुदीमधून अतिरिक्त रक्कम देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.