उल्हासनगर: मुंबईला जाणारी १० वाजून ३२ मिनिटांची जलद लोकल फलाट सोडून पुढे गेल्याचा धक्कादायक प्रकार विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात समोर आला आहे. लोकलचे तीन डब्बे कल्याणच्या दिशेने फलाटाच्या पुढे गेले. त्यामुळे सिग्नल यंत्रणा काही मिनिटे ठप्प झाली. प्रवाशांना उड्या मारून लोकलमधून उतरावे लागेल. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील तलावांचा कायपालट? २८ कोटींचा प्रस्ताव तयार
कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल १० वाजून ३२ मिनिटांनी विठ्ठलवाडी स्थानकात येणे अपेक्षित असते. ही लोकल आज दहा मिनिटे उशिराने आली. मात्र लोकल गाडीचे पहिले तीन डब्बे फलाट सोडून पुढे गेल्याने एकच गोंधळ उडाला. लोकल फटालाट न थांबता पुढे जाऊन थांबली. त्यामुळे अनेक प्रवाशांची कोंडी झाली. ज्यांना लोकलमधून उतरायचे होते त्यांना थेट लोकलमधून उड्या माराव्या लागल्या. यात महिला प्रवाशांचे हाल झाले.
हेही वाचा >>> डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाला जुगार-मटक्याचा विळखा, पादचाऱ्यांना उघडपणे लुटण्याचे प्रकार
अनेक प्रवाशांची धावाधाव झाली. ही लोकल पुढे गेल्याने सिग्नल यंत्रणा काही काळ ठप्प झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे काही काळ लोकलचा खोळंबा झाला. त्याचा मागच्या लोकलवर तर फरक पडलाच. मात्र लोकलमध्ये असलेल्या प्रवाशांनाही लोकलमध्ये ताटकळत थांबावे लागले. मोटरमनच्या चुकीमुळे हा प्रकार झाला की आणखी कशामुळे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र वेळीच गाडी न थांबवल्याने हा प्रकार झाल्याचा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.