मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमध्ये १२ जणांनी एका तरूणावर स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १२ डिसेंबरला ही घटना घडली होती. तरूणावर उपचार सुरू असल्याने गुरूवारी याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा>>>केडीएमटीने डोंबिवली-पनवेल बस फेऱ्या वाढविल्या
अनुरागकुमार कश्यप (२९) असे जखमीचे नाव असून तो कल्याणमध्ये राहातो. १२ डिसेंबरला सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास तो मित्रासोबत कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाडीतून प्रवास करत होता. त्याचवेळी १२ जण त्याच्या मागे रेल्वेगाडीत चढले. त्यांनी अनुरागकुमारला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेत त्यांनी त्याच्या मित्रासही मारहाण केली. मारहाण करणाऱ्या एकाच्या हातात स्क्रू- ड्रायव्हर होता. त्याने तो अनुरागकुमारच्या छातीजवळ खूपसला. हा सर्व प्रकार कळवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान घडला. लोकल मुंब्रा स्थानकात थांबल्यानंतर सर्व आरोपी स्थानकात उतरले. अनुरागकुमारवर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरूवारी रात्री त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहे.