कल्याण – कल्याणमधील दुर्गाडी किल्ला भागातील रस्त्यावर शुक्रवारी सकाळी भरधाव वेगात असलेल्या एका ट्रक चालकाने भिवंडीकडून दुचाकीवर येत असलेल्या वडील, मुलीच्या वाहनाला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीसह वडील, मुलगी जमिनीवर पडले. सुदैवाने ट्रकच्या बाजुला पडल्याने दोघेही थोडक्यात बचावले. दोघांच्याही पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत.
त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मनोहर शिवराम तांबे (५७), मुलगी प्रज्ञा मनोहर तांबे (२६) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांची नावे आहेत. त्यांच्या पायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
मनोहर तांबे कुटुंबीय भिवंडी येथे राहते. मनोहर यांच्यासह त्यांची मुलगी प्रज्ञा तांबे कल्याणमध्ये नोकरी करते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ते भिवंडी दिशेकडून आपल्या दुचाकीवरून कल्याण शहरात येत होते.कल्याण शहरात दुर्गाडी किल्ल्यावरून प्रवेश करत असताना दुर्गाडी चौकात एक ट्रक चालक भरधाव वेगात चालला होता. या ट्रक चालकाने मनोहर तांबे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत वडील, मुलगी दुचाकीसह दूर फेकले गेले. सुदैवाने ते ट्रकपासून काही अंतरावर फेकले अन्यथा त्यांच्यावर जीवावर बेतले असते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेनंतर पादचारी आणि इतर वाहन चालकांनी ओरडा केल्याने ट्रक चालक जागीच थांबला. तो पळून जाऊ नये म्हणून नागरिकांनी त्याला घडल्या घटनेबद्दल जाब विचारला. गंभीर जखमी झालेल्या मनोहर, प्रज्ञा यांना नागरिकांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
कल्याण वाहतूक विभाग, बाजारपेठ पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. घडल्या घटनेचा पंचनामा करून त्यांनी ट्रक चालकाला वाहनासह ताब्यात घेतले. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असल्याने पोलिसांनी ट्रक चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दुर्गाडी चौकातून सर्व प्रकारची वाहने धावत असतात. चोवीस तास हा रस्ता वाहनांनी गजबजलेला असतो. सकाळच्या वेळेत या चौकात वाहतूक पोलीस तैनात नसले की जड, अवजड ट्रक चालक भरधाव वेगात वाहने चालवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. या चौकाच्या चारही बाजुने चौकाच्या दिशेने येताना गतिरोधक बांधावेत अशी प्रवाशांची मागणी आहे. शाळेच्या लहान, मोठ्या बस याठिकाणाहून नियमित धावत असतात. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने या चौकात पालका, पोलीस यांनी यंत्रणा उभी करावी, सकाळपासून या चौकात वाहतूक पोलीस तैनात ठेवण्यात यावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे.