डोंंबिवली – येथील पश्चिमेतील गरीबाचापाडा भागात बुधवारी संतप्त वडिलांनीच आपल्या तीस वर्षाच्या मुलाची डोक्यात दांडके मारून आणि गळा दोरीने आवळून खून केला. मुलाला दारूचे व्यसन होते. तो दररोज आई, वडिलांना मारहाण करायचा, या रागातून वडिलांनी हे कृत्य केले असल्याचे विष्णुनगर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे, असे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले. हरेश अभिमन्यू पाटील (३०) असे मरण पावलेल्या तरूणाचे नाव आहे. अभिमन्यू पाटील(६०) हे त्याचे वडील आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्या विरूध्द खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
हेही वाचा >>> वाघबीळ गावात रस्त्यावर गटारगंगा, रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
हरेशचा पडून मृत्यू झाला असल्याची तक्रार हरेशच्या वडिलांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी अकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल केला होता. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक केतन पवार, पोलीस निरीक्षक गमे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. त्यावेळी हा खून नाही तर, वडील अभिमन्यू पाटील यांंनी मुलगा हरेश याच्या डोक्यात दांडक्याने मारहाण करून त्याला दोरीने गळफास देऊन ठार मारले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हरेषला दारू पिण्याचे व्यसन होते. तो दररोज आई, वडिलांना मारहाण करायचा. या रागातून हे कृत्य वडिलांनी केले आहे, असे साहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे यांनी सांगितले.