ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आठ महिन्यांचा बाळाचा मृतदेह घेऊन वडील पसार झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकारानंतर कळवा पोलिसांनी शीळडायघर भागात शोध घेऊन बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला. बाळाचे शवविच्छेदन टाळण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे. या प्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात एकाच दिवशी १८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे कळवा रुग्णालयाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
हेही वाचा >>> भाईंदर: खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने खेळाडूचा मृत्यू
कळवा येथे ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. एका आठ महिन्याच्या बाळाला न्यमोनिया झाला होता. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला उपचारासाठी गुरुवारी रात्री १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. उपचारदरम्यान शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास बाळाचा मृत्यू झाला. याबाबत रुग्णालय प्रशासनाने त्याच्या आई-वडिलांना माहिती दिली. बाळाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते, असे बाळाच्या पालकांकडून डाॅक्टरांना सांगण्यात आले होते. त्यामुळे औषधांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता डाॅक्टरांना वाटत होती. यामुळे बाळाचे शवविच्छेदन करण्यात येणार होते. याबाबत बाळाच्या आई-वडिल आणि नातेवाईकांना कळविण्यात आले. परंतु बाळाच्या शवविच्छेदनास पालकांनी विरोध केला. काही वेळानंतर बाळाला ज्या कक्षात ठेवण्यात आले होते. तिथे बाळाचे वडिल शिरले. त्यांनी बाळाला उचलले आणि रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या रिक्षातून पळ काढला. सुरक्षा रक्षकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पंरतु त्यांचा शोध घेणे शक्य झाले नाही. याबाबत माहिती मिळताच कळवा पोलिसांनी तपास करून शीळ-डायघर भागातून बाळाचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षे विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सुमारे महिन्याभरापूर्वी या रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याच्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यानंतर पुन्हा कळवा रुग्णालयात हा प्रकार घडल्याने रुग्णालयाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.