ठाणे : महापालिका क्षेत्रात झालेल्या पहिल्या पावसानंतर रस्त्यालगत असलेल्या विद्युत वाहिन्या जळण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. अशा घटनांमुळे विजेचा धक्का लागून जिवितहानी होण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाने विशेष मोहिम हाती घेऊन शहरातील पथ दिव्यांचे खांब आणि त्यांना जोडण्यात आलेल्या विद्युत वाहिन्यांची तपासणी सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रात ४३ हजारांच्या आसपास पथदिवे आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, उद्यान तसेच लोकवस्तीत हे पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. या पथदिव्यांसाठी रस्त्याच्या बाजूने विद्युत वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. काही वेळेस खोदकामादरम्यान वाहिन्यांना धक्का लागून त्या अर्धवट तुटतात. पावसाळ्यात त्या भागात पाणी साचल्यानंतर वाहिन्यांमधून प्रवाहित होणारा वीजेचा प्रवाह पाण्यात उतरतो. यामुळे वीजेचा धक्का बसून जिवीतहानी होण्याची शक्यता असते. काही वेळेस वाहिन्या जळण्याचे प्रकार घडतात. यंदा पहिल्याच पावसानंतर असे प्रकार समोर येऊ लागले आहेत. दोन दिवसांपुर्वी सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या नौपाडा परिसरातील बी केबीन भागातील रस्त्यालगत एक विद्युत वाहीनी जळून परिसरात धुर पसरला होता. तसेच तेथे साचलेल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह उतरला होता.

हेही वाचा >>> राज्यमार्गाशेजारीच्या अतिक्रमणांवर एमआयडीसी कार्यालयाकडून कारवाई, अतिक्रमणमुक्त रस्ता ठेवण्याचे आव्हान

याठिकाणी वाहिन्या टाकण्याच्या कामासाठी खोदाई करण्यात आली होती. या कामामुळेच वाहिनी तुटून हा प्रकार घडल्याचा अंदाज विद्युत विभागाकडून वर्तविला जात आहे. कळवा परिसरात पथ दिव्याच्या खांबाला वीजेचा धक्का लागून एका श्वानाचा मृत्यु झाला आरोप करण्यात आला होता. परंतु या खांबाला विजेचा धक्का लागत नसल्याने श्वानाचा मृत्यु इतर कारणामुळे झाल्याचा दावा पालिकेने केला होता. खांबाला विजेचा धक्का लागत नसल्याचा पुरावा म्हणून पालिकेने चित्रफित प्रसारित केली होती. असे असले तरी पहिल्या पावसानंतर अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या जळण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. अशा घटनांमुळे विजेचा धक्का लागून जिवितहानी होण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी पालिकेने पाऊले उचलली असून त्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये पथके नेमणून प्रत्येक विद्युत खांब आणि त्यांना जोडणाऱ्या विद्युत वाहिन्यांची तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली-कल्याणमधील रस्त्यांवर खड्डे कायम; पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. याशिवाय गॅस, इंटरनेट, दूरध्वनीच्या वाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. या कामादरम्यान अनेक ठिकाणी वाहिन्या धक्का लागून त्या अर्धवट अवस्थेत तुटल्या असू शकतात. याच भागात पावसाचे पाणी साचले तर दुर्घटना घडू शकते. हि बाब लक्षात घेऊन पालिकेने विशेष मोहिम हाती घेऊन विद्युत वाहिन्यांची तपासणी सुरू केली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे शहरातील पथदिव्यांचे खांब तसेच त्याला जोडण्यात आलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे वीजेचा धक्का लागून दुर्घटना होऊ नये यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. विद्युत विभागाची पथके प्रत्येक विद्युत खांब आणि त्यांना जोडणाऱ्या विद्युत वाहिन्यांची तपासणी करीत आहेत. – शुभांगी केसवानी उपनगर अभियंता, विद्युत विभाग, ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear of accidents channels street lamp special campaign by the municipality to prevent accidents ysh
Show comments