ठाणे : घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने दिलेल्या आदेशानुसार जाहिरात कंपन्यांनी २६० जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केले असले तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगाने पडून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान, फ्लॉवर व्हॅली रस्त्यावरील भले मोठे जाहिरात फलक झुलताना दिसून आले. याबाबतची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित होताच पालिकेने हा जाहिरात फलक काढण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील घाटकोपर भागातील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागाने शहरातील १४ बेकायदा जाहिरात फलक हटविण्याची कारवाई केली आहे. याशिवाय, ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा मोठ्या असलेल्या ३२ फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून त्याचबरोबर जाहिरात कंपन्यांनी २६० जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केले आहेत. असे असले तरी कंपन्यांनी सादर केलेली प्रमाणपत्र योग्य आहेत की नाही, याची खातर करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. असे असतानाच, स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलेला एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगाने पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे मंगळवारच्या पावसादरम्यान दिसून आले.

हेही वाचा – डोंबिवलीतील कुटुंबाला युरोपचे पर्यटन महागात पडले

हेही वाचा – ठाणे : कोट्यवधीचे सोन्याचे दागिने कर्मचाऱ्याकडून चोरी

मंगळवारी पावसाला सुरुवात झाली होती. मंगळवारी दुपारी वाऱ्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील फ्लॉवर व्हॅली परिसरात एक लोखंडी जाहिरात फलक झुलताना आढळून आला. याबाबची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर ठाणे महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र संबंधित कंपनीकडे असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जाहिरात फलक आणि जागा मालकाला नोटीस बजावली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठाणे महापालिकेने जाहिरात फलक हटविण्याची सूचना देखील केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear of fall of billboards due to wind speed in thane mnc issued a notice regarding the removal of the board ssb