tv14सध्या माघ महिना चालू आहे. माघ महिन्यात रात्रीच्या प्रारंभी मघा नक्षत्र पूर्वेला उगवते आणि रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेला मावळते. रात्री नऊ वाजता पूर्व आकाशात पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी नक्षत्रांतील तारकांचे मनोहारी दर्शन होते. आकाशमध्यावर रोहिणी, मृग, आद्र्रा नक्षत्रांतील तारका दिसतात आणि पश्चिम आकाशात कृत्तिका, भरणी, अश्विनी आणि रेवती नक्षत्रांतील तारका दिसतात.
उत्तर आकाशात ध्रुव तारकेच्या डाव्या बाजूला ‘एम’ तारकाकृती शर्मिष्ठा दिसते तर उजव्या बाजूला सप्तर्षीमधील ऋतु, पुलह, पुलस्त्य, अत्रि, अंगीरा, वसिष्ठ आणि मरिची या तारका क्रमाक्रमाने उगवताना दिसतात. उत्तरेस ब्रह्महृदयची ठळक तारका आपले लक्ष वेधून घेते. दक्षिण आकाशात अगस्ती आणि अगदी क्षितिजालगत अग्रनंदचे दर्शन होते.
चंद्र : माघ महिन्याची पौर्णिमा मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी उत्तररात्री ४ वाजून ३९ मिनिटांनी पूर्ण होईल. माघ अमावास्या बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी उत्तररात्री ५ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल. फाल्गुन महिन्याची नूतन चंद्रकोर शुक्रवार दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर दिसेल. चंद्रकोरीचे दक्षिणेकडील शृंग जास्त उंच दिसेल.
बुध ग्रह : बुध ग्रह ५ फेब्रुवारीपासून दररोज सूर्योदयापूर्वी पहाटे पूर्व क्षितिजावर श्रवण नक्षत्रात दर्शन देईल. बुध अंधूक दिसत असल्याने ओळखणे तसे कठीण जाते. २४ फेब्रुवारी रोजी तो सूर्यापासून जास्तीतजास्त दूर आहे. त्या दिवशी बुध सूर्योदयापूर्वी सुमारे पावणेदोन तास अगोदर उगवून दर्शन देईल. त्याची प्रत शून्य राहील. १७ फेब्रुवारी रोजी पहाटे बुध-चंद्र युती आहे. बुध चंद्राच्या तीन अंश दक्षिणेकडील बाजूस दिसेल. पहाटे लवकर उठून त्यांचे पूर्वेला जरूर दर्शन घ्यावे.
शुक्र ग्रह : तेजस्वी शुक्र दररोज रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर दर्शन देईल. ७ फेब्रुवारीपर्यंत तो शततारक, १८ फेब्रुवारीपर्यंत पूर्वा भाद्रपदा आणि त्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात दर्शन देईल. शुक्र वजा ३-१ प्रतीचा तेजस्वी दिसेल. त्यामुळे तो सहज ओळखता येईल.
मंगळ ग्रह : मंगळ ग्रह रात्रीच्या प्रारंभी पश्चिम क्षितिजावर दर्शन देईल. १६ फेब्रुवारीपर्यंत मंगळ पूर्वा भाद्रपदा आणि त्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात दिसेल.
गुरू ग्रह : गुरू ग्रह रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात आश्लेषा नक्षत्रात ठळक दर्शन देईल. त्याची प्रत वजा २-६ राहील. दुर्बिणीतून गुरूच्या चार चंद्रांचे दर्शन होईल.
शनी ग्रह : शनी ग्रह पहाटे मध्य आकाशात अनुराधा नक्षत्रात दर्शन देईल.
दा. कृ. सोमण

या महिन्यातल्या महत्त्वाच्या खगोलीय घटना
* ४ फेब्रु. गुरू चंद्राच्या ५ अंश उत्तरेस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होईल.
* ६ फेब्रु. चंद्र पृथ्वीपासून दूर-४ लक्ष ६१५० कि. मी.
* १३ फेब्रु.    शनी चंद्राच्या २ अंश दक्षिणेस दिसेल. पहाटे मध्य आकाशात दिसतील.
* १७ फेब्रु. बुध चंद्राच्या ३ अंश दक्षिणेस दिसेल. पहाटे पूर्व क्षितिजावर दिसतील.
* १९ फेब्रु.    चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लक्ष ५६९९५ कि.मी.
* २१ फेब्रु.    मंगळ चंद्राच्या १.५ अंश दक्षिणेस दिसेल. रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात दिसतील.
* २१ फेब्रु.    शुक्र मंगळाच्या ०.५ अंश दक्षिणेस दिसेल.
* २५ फेब्रु. रोहिणी चंद्राच्या १ अंश दक्षिणेस दिसेल.

शनिवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर काळोख पडल्यावर पश्चिम आकाशात पाहाच. चंद्र-शुक्र-मंगळ युतीचे सुंदर दर्शन होईल. रात्री ९ वाजेपर्यंत हे दृश्य पाहता येईल.

Story img Loader