अंबरनाथच्या कस्तुरी उतेकरची कहाणी यापेक्षा वेगळी नाही. गेल्या २०-२५ वर्षांपासून अंबरनाथमध्ये रिक्षा चालवणारे कस्तुरीचे वडील ‘रिक्षावाले काका’ म्हणून प्रसिद्ध आहेत. पण रिक्षा चालवून आर्थिक परिस्थिती फारशी बदलली नाही. उलट त्यामुळे प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या. पुढे कस्तुरीच्या दहावीनंतरच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. अशा वेळी एका दात्याने तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. सध्या ती पुण्याच्या व्ही.आय.टी. कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
देणाऱ्या हातांना इतके बळ मिळते कुठून, असा एक प्रश्न नेहमी पडतो. बऱ्याचदा स्वत:वर किंवा आपल्या जवळच्या माणसावर ओढवलेल्या परिस्थितीतून समाजातील गरीब घरातील मुलांना मदत करण्याची प्रेरणा त्यांना मिळत असावी. नाहूर गावात राहणाऱ्या साधना यादवला मदत करणाऱ्या दात्याची गोष्ट अशीच होती. साधनाचे वडील एका कारखान्यात कामगार आहेत. तिच्या घरची परिस्थिती इतकी हलाखीची की स्वयंपाकाच्या १५-२० भांडय़ांशिवाय एक वस्तू नाही. अशा घरात मुलीच्या दहावीनंतरच्या शिक्षणाचा विचार तरी कसा करणार? पण एक गृहस्थ मदतीला धावले. वय वर्ष ७५. पण इतरांना मदत करण्याचा उत्साह दांडगा. ‘मी असेपर्यंत या मुलीच्या शिक्षणाला पाठबळ देईन,’ असं सांगत लगेच धनादेश लिहून दिला. पुढे एका भेटीत त्यांनी सांगितलं की त्यांच्या बहिणीला नर्सिगचं शिक्षण घ्यायचं होतं. पण परिस्थितीमुळे ते जमलं नाही. साधनाला पाहिल्यावर त्यांना ते दिवस आठवले आणि तिला मदत करण्याचा निर्धार पक्का झाला.
साधनाला मदत मिळवून देण्यामागे फोर्टिज नर्सिग कॉलेजचे सेक्रेटरी विजय इंगवले यांचा वाटा मोलाचा. तिची परिस्थिती पाहून त्यांनी मदतीसाठी शोधाशोध सुरू केली. तसं करता करता ते माझ्यापर्यंत पोहोचले आणि मग पुढे साधनाला मदत मिळाली. आजवर इंगवले यांनी अशा पाच-सहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दुवा बनण्याचे काम केले आहे. या वर्षी पाच विद्यार्थ्यांची सोय अंबरनाथ येथील एक वसतिगृह शोधून काढून विनामूल्य करवून दिली आणि दुपारच्या जेवणाची सोय कँटीनमध्ये सवलतीच्या दरात करून दिली, त्यासाठी मी एक दाता उपलब्ध करून दिला. दुपारचे जेवण पसे देऊन शक्य नसल्याने परत निघालेल्या मुलांना आम्ही थोपवू शकलो. पुढील वर्षी त्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू शकेल आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होईल. या विद्यार्थ्यांसाठी इंग्लीशचे विशेष प्रशिक्षणही कॉलेजने उपलब्ध करून दिले आहे. देणारे हात कोणतेही असले तरी देण्यामागची त्यांची भावना समाजाला बळकटी देण्याचीच असते. कुणी अशाच परिस्थितीला तोंड देऊन पुढे आलेला असतो, तर कुणाची उच्च शिक्षणाची इच्छा परिस्थितीमुळे अपूर्ण राहिलेली असते. कारण काहीही असलं तरी जी वेळ आपल्यावर आली ती अन्य मुलांवर येऊ नये, या हेतूनेच हे दाते पुढे येत असतात.
अशाच प्रकारच्या अनेक विद्यार्थ्यांच्या यशोगाथा यापुढेही आपल्याला वाचायला मिळतील. असे आपण न पोचू शकलेले अनेक विद्यार्थी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यापर्यंत पोचणारे अनेक जण निर्माण झाले आणि त्यांना बळ देणारे असंख्य हात निर्माण झाले तर भविष्य निश्चित उज्ज्वल आहे.
रवींद्र कर्वे
सेकंड इनिंग :देण्यामागची भावना..
अअत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ आणि मुंबई, ठाण्यातील देणगीदारांच्या माध्यमातून पुढील शिक्षणासाठी मदत केली जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-02-2015 at 12:14 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feeling good about giving