सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल २५ डिसेंबरपासून पुन्हा भाईंदरहून सोडण्याचे पश्चिम रेल्वे व्यवस्थापनाने नुकतेच मान्य केले. त्यामुळे मीरा-भाईंदरमधील महिला प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी या लोकलवरून आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
पूर्वी भाईंदरहून सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी सुटणारी विशेष महिला लोकल १ ऑक्टोबरपासून विरारहून सोडण्यात येऊ लागली. यामुळे इथल्या महिला प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. महिलांनी या विरोधात आंदोलनही छेडले होते. त्यानंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने महिला विशेष लोकल २५ डिसेंबरपासून पुन्हा भाईंदरहून पूर्वीच्याच वेळेवर सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. मात्र ही लोकल पुन्हा भाईंदरहून सोडण्यासाठी प्रशासनाला आपणच भाग पाडल्याचे पटवून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात आटापिटा सुरू झाला आहे. दोन्ही पक्षांनी यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन आपण यासाठी कसे प्रयत्न केले हे दाखविण्याचा प्रयत्न केला.
लोकल पुन्हा भाईंदरहून सुरु व्हावी यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वानाच रेल्वे प्रशासनाने पत्र पाठवून लोकल २५ डिसेंबरला सुरु होत असल्याचे कळविले आहे. गेल्या आठवडय़ात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात आपल्या प्रयत्नामुळेच ही महिला विशेष लोकल सेवा सुरू असल्याचा दावा केला.
भाजपने या विषयावर पत्रकार परिषद घेतल्याचे समजताच शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी देखील शुक्रवारी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेतली. लोकलसाठी आंदोलन करु असा इशारा अधिकाऱ्यांना दिल्याने त्यांनी पुन्हा लोकल सुरु केली, असा दावा राजन विचारे यांनी केला आहे. या दाव्या प्रतिदाव्यांमुळे नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक झाली आहे. कोणाच्याही प्रयत्नांमुळे का होईना परंतू लोकल पुन्हा भाईंदरहून सुरु झाली यातच आनंद आहे अशी प्रतिक्रिया महिला प्रवासी व्यक्त करत आहेत.
आपण थेट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने लोकल पुन्हा भाईंदरहून सोडण्याचे मान्य केले. -नरेंद्र मेहता, आमदार, भाजप
महिला विशेष लोकल पुन्हा भाईंदरहून सुरु व्हावी या मागणीसाठी आपण आंदोलन करु असा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांना दिला होता. त्याची दखल घेऊनच अधिकाऱ्यांनी पुन्हा लोकल सुरु केली. -राजन विचारे, खासदार, शिवसेना