ठाणे : ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका महिलेस अटक केली आहे. ही महिला मुंबई येथील एका नामांकित शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. मागील तीन वर्षांपासून ती वेश्या व्यवसाय चालवित असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागात वेश्या व्यवसाय चालविणारी दलाल महिला बुधवारी तिच्या तावडीत असलेल्या काही महिलांना वेश्यागमनासाठी आणणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के. वालगुडे, पोलीस हवालदार आर. यु. सुवारे, के. बी. पाटील, व्ही. आर. पाटील यांच्यासह पोलीस पथकाने सापळा रचून दलाल महिलेला ताब्यात घेतले.
तिची चौकशी केली असता ती मुंबईतील एका नामांकित शाळेत शिक्षिका असल्याचे समोर आले आहे. तसेच ती वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांची तिच्या तावडीतून सुटका केली आहे. तर वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.