डोंबिवली – डोंबिवली पूर्व भागात प्रगती महाविद्यालयाजवळील चौकात वाहतूक विभागातील वाहतूक सेवक निशा जाधव शुक्रवारी वाहतूक नियोजनाचे काम करत होत्या. यावेळी एका दुचाकी स्वाराने भरधाव वेगात दुचाकी चालवून वाहतूक सेवक जाधव यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. वाहतूक सेवक जाधव यांनी जखमी अवस्थेत तोल सांभाळत ठोकर देणाऱ्या दुचाकी स्वाराला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुचाकी स्वाराने जखमी निशा जाधव यांना मदत करण्याऐवजी त्यांचा हात जोराने पिळला. त्यांना भर रस्त्यात मारहाण केली.
वाहतूक सेवक निशा जाधव यांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दुचाकी स्वारा विरुध्द निष्काळजीपणे दुचाकी चालवून जीविताला धोका निर्माण केल्याची, तसेच मारहाणीची तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जखमी जाधव यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यात आले. डाॅक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
डोंबिवली वाहतूक विभागातील वाहतूक सेवक पूर्व भागातील प्रगती महाविद्यालयाजवळील चौकात शुक्रवारी वाहतूक नियोजनाचे करत होत्या. एक दुचाकी स्वार भरधाव वेगात, निष्काळजीपणे दुचाकी चालवत निशा जाधव यांच्या दिशेने पाठीमागून आला. त्याने निशा यांना जोराची दुचाकीने धडक दिली. अचानक धडक बसल्याने निशा जमिनीवर कोसळल्या. पादचारी निशा यांच्या दिशेने मदतीसाठी धावले. निशा यांनी दुचाकी स्वाराला दुचाकी व्यवस्थित चालविता येत नाही का, असा प्रश्न करताच दुचाकी स्वाराने निशा यांना उलट उत्तरे करून त्यांचा हात पिरगळला. त्यांना मारहाण केली. दुचाकीच्या धडकेत निशा यांच्या पायाला दुखापत झाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांच्या सूचनेवरून वाहतूक सेवक दिनकर सोमासे, महिला सेविका कानेरकर, साळवे यांनी जखमी निशा जाधव यांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील उपचारानंतर पोलिसांनी निशा जाधव यांच्या तक्रारीवरून दुचाकी स्वारा विरुध्द गुन्हा दाखल केला. शाळांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. काही शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. अनेक शाळकरी मुले आई, बाबा नोकरीला गेल्यानंतर आपली दुचाकी काढून, एकेका दुचाकीवर तीन ते चार जण बसून शहराच्या विविध भागात दुचाकी चालवित असल्याचे दृश्य कल्याण, डोंबिवलीत दिसत आहे. या शाळकरी मुलांना पोलिसांकडून तंबी देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.