मुंब्य्रातील रेतीबंदर बोगद्याजवळ दुर्घटनेची भीती
मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पारसिक बोगदा धोकादायक ठरीत असतानाच आता मुंब्रा येथील धिम्या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांवरही दुर्घटनेची टांगती तलवार आहे. या मार्गावरील रेल्वे बोगद्यालगत असलेल्या पुलावरील कुंपण पडण्याच्या बेतात असून पावसाच्या माऱ्याने ते अधिक कमकुवत होत आहे. परंतु, याकडे अद्याप रेल्वे प्रशासन वा स्थानिक प्रशासकीय यंत्रणांचे लक्ष गेलेले नाही.
मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गिकेवरून मुंबई तसेच कर्जत-कसारा अशा अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेच्या या मार्गावरून मुंब्रा रस्ता जातो. वाहनांच्या संरक्षणासाठी या रस्त्याला सीमेंटचे कुंपण घालण्यात आले आहे. मात्र दोन्ही दिशांना बांधण्यात आलेले हे कुंपणाचे स्लॅब पडण्याच्या बेतात आहेत. या कुंपणाचा काही भाग पूर्वीच जीर्ण झालेला आहे. मात्र, हा भाग पडू नये यासाठी या पुलाला तारा बांधण्यात आल्या आहेत. या तारांनी कुंपणाला अनेक वर्षे तारले. मात्र, आता या तारा गंजल्या असल्याने तसेच सततच्या पावसाने हा भाग रेल्वे रुळांवर कधीही पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण कुंपण सीमेंटचे असल्याने यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या मार्गावरून वाहनेही भरधाव येत असल्याने तसेच वळणावर हा पूल असल्याने कुंपणाला धडकून मोठी जीवितहानी होण्याचीही शक्यता वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.
रेल्वेच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर आहे. पूल नेमका कोणाच्या अख्यत्यारीत येतो, याची संबंधित विभागाकडे चौकशी करून माहिती घेण्यात येईल.
– ए. के. सिंग, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी