वसई महापालिकेचा जलवाहतूक खात्याकडे प्रस्ताव

 वसई : ठाण्याहून वसई खाडीपर्यंत सुरू होणारी रो रो सेवा नायगाव खाडीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव वसई विरार महापालिकेने केंद्रीय जलवाहतूक खात्याकडे ठेवला आहे. नायगाव खाडीचे रुंदीकरण करून ही सेवा सुरू केल्यास या पट्टय़ातील अनेक गावांना त्याचा फायदा होणार आहे.

महामार्गावरून वाहतुकीसाठी लागणारा विलंब, वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय या गोष्टी टाळण्यासाठी जलमार्गे मालवाहतूक अर्थात रो रो वाहतुकीचा पर्याय पुढे आला आहे. ठाणे खाडीतून भाईंदर आणि वसई येथील रो रो सेवेला मंजुरी देण्यात आलेली आहे. ही सेवा वसईपर्यंत न ठेवता नायगाव खाडीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला आहे. याचा फायदा नायगाव, जुचंद्र, मालजीपाडा, राजावली, टिवरी, ठाणे, कल्याण अशा गावांतील नागरिकांना होऊ  शकेल.

सध्या वसई खाडी ही २१ मीटर रुंद आहे. मात्र या खाडीची रुंदी ४० मीटपर्यंत वाढवण्यात आल्यास या ठिकाणी ही सेवा सुरू करता येईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे. महापालिकेच्या शिष्टमंडळाने यासाठी केंद्रीय जलवाहतूक आणि रस्ते व बांधकाममंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. याबाबत बोलताना माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले की, या सेवेमुळे वसई पूर्वेकडील अनेक गावांना फायदा होईल आणि व्यवसाय वृद्धिंगत होऊ  शकणार आहे. महापालिकेच्या या प्रस्तावाला केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मानकर यांनी सांगितले.

रो रो सेवा म्हणजे काय?

रो रो सेवा म्हणजे रेल्वेच्या मालगाडीतून जशी मालवाहतूक के ली जाते, त्याचप्रमाणे जल मार्गानेही मालवाहतूक गाडय़ा आणि इतर गाडय़ा वाहून नेणे, प्रवासी वाहतूक या सर्व गोष्टी आता जलमार्गाने सुरू होणार आहेत. जल मार्गाने होणारा प्रवास हा पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त असा प्रवास आहे. रस्ते वाहतुकीला आणि रेल्वे माल व प्रवासी वाहतुकीला पर्याय म्हणून रो रो जलवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे.

काय फायदा होणार?

’ नागरिकांना जलमार्गाने ये-जा करण्यासाठीचा प्रवास सुखकर होईल.

’ महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका.

’ वसई-विरार शहरात पर्यटन क्षेत्रात वाढ होईल.

’ रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

’ प्रदूषणाला आळा बसेल.

औद्योगिक क्षेत्रालाही याचा फायदा होईल.

Story img Loader