ठाणे – दिवाळी सुट्टीनंतर शाळा, महाविद्यालयांमध्ये महोत्सवाचे वेध लागतात. डिसेंबर, जानेवारीच्या कालावधीत हे महोत्सव पार पडतात. यंदाही ठाणे शहरातील शाळा – महाविद्यालयांमध्ये महोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. अनेक शाळा – महाविद्यालयाने वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव आयोजित केला आहे.
डिसेंबर – जानेवारी महिन्यात शाळा महाविद्यालयात एक वेगळेच वातावरण पाहायला मिळते. काही ठिकाणी क्रीडा स्पर्धांची गडबड तर, काही ठिकाणी नाटक, नृत्य यांच्या रंगीत तालीम हे चित्र या कालावधीत शाळा – महाविद्यालयांमध्ये पाहायला मिळते. वर्षातून एकदा होणाऱ्या या महोत्सवाची शालेय आणि महाविद्यालयीन मुले आतुरतेने वाट पाहत असतात. महोत्सवाच्या महिनाभर आधीपासून विद्यार्थी आणि शिक्षक यासाठी तयारीला लागतात. ठाणे शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये या महोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. अनेक शाळांच्या तारखाही ठरल्या आहे. तर, काहींचे अजून नियोजन सुरु आहे. ठाणे शहरातील नौपाडा भागात असलेल्या सरस्वती मंदिर ट्रस्टच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा वार्षिक महोत्सव हा येत्या शनिवारी आहे. या शाळेचा यंदाचा महोत्सव भारताची सहल या संकल्पनेवर पार पडणार आहे. यामध्ये भारतातील विविध राज्यांची संस्कृती, खाद्य, जीवनशैली असे सर्वच नृत्य, गाणी आणि नाटकाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती सरस्वती मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.
हेही वाचा – ठाणे ग्रामीणमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी ठप्प, महास्वयंम पोर्टलचा सर्व्हर संथगती
या संस्थेचा मराठी माध्यमाच्या शाळेचा वार्षिक महोत्सव हा २४ आणि २५ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. वागळे इस्टेट भागातील सावरकरनगर परिसरात असलेल्या भारतरत्न इंदिरा गांधी शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी आणि आर.जे. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव येत्या २१ आणि २२ डिसेंबरला पार पडणार आहे. यंदा या शाळेचा आणि महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव हा विविध लोककलांवर आधारित असणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापक नरेंद्र मोरे यांनी दिली. तर, ठाण्यातील इतर शाळा, महाविद्यालयांचे महोत्सवदेखील डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात पार पडणार असून त्यासाठी शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापकांकडून तयारी सुरु आहे.
हेही वाचा – ठाण्यात १२४७ दुकाने मराठी पाटीविना, ठाणे महापालिकेच्या सर्वेक्षणात माहिती उघड
बेडेकर महाविद्यालयात नवरंग महोत्सव
ठाण्यातील जोशी – बेडेकर महाविद्यालयात नवरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही येत्या शनिवारपासून हा महोत्सव सुरु होणार आहे. सात दिवस रंगणाऱ्या या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व आयोजनाची धुरा महाविद्यालयीन विद्यार्थी सांभाळतात. या महोत्सवात रांगोळी, मेहेंदी, गायन, नृत्य, प्रश्न मंजुषा, बातमी वाचन, काव्य लेखन, कथा लेखन यांसारख्या विविध स्पर्धा पार पडणार आहेत. विद्यार्थी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होत असल्याची माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली.