दीप अमावास्येच्या निमित्ताने कल्याण मधील बालक मंदिर शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक कलाकुसरी करून विद्यार्थ्यांनी जुन्या जमान्यातील, नवीन दिव्यांची आरास करून दीप प्रज्वलित केले होते. आकर्षक मनोहरी दृश्य या उत्सवामुळे निर्माण झाले होते. मराठी, इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
प्राचीन काळापासून आपल्या सण, उत्सवांना विशेष महत्व आहे. आषाढातील दीप आमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते. परंतु पाश्चात्य पगड्यामुळे आपल्या मानसिकतेत बदल होत आहेत. त्यामुळे अलीकडे हा सण गटारी नावाने ओळखला जातो. हा चुकीचा पगडा मुलांवर पडू नये. दीप आमावस्येचे महत्व मुलांना कळावे म्हणून बालक मंदिर शाळेने हा उपक्रम गुरुवारी शाळेत राबविला.
विद्यार्थ्यांनी घरून विविध आकाराचे दिवे, पणत्या, समई, लामण दिवे, दीपमाळ, कंदिल, चिमणी दिवे आणले होते. या दिव्यांची आकर्षक पध्दतीने शाळेच्या सभागृहात मांडणी करण्यात आली. वर्ग खोल्यांच्या खिडक्या बंद करून मग दिवे प्रज्वलीत करण्यात आले. त्यामुळे प्रसन्न वातावरण शाळेत तयार झाले होते. मिठाची भव्य रांगोळी काढण्यात आली होती.
या उपक्रमात व्यवस्थापक सर्वोत्तम केतकर, मुख्याध्यापिका कल्पना पवार, विद्या जोशी, शीतल पडवळ, ओक शाळेच्या मुख्याध्यापिका माळी सहभागी झाले होते.