लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सार्वजनिक स्वच्छतेची कामे नियमित झाली पाहिजेत म्हणून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दोन महिन्यापूर्वी पालिकेच्या २५ विभागांमध्ये अनेक वर्ष शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या १५६ सफाई कामगारांच्या घनकचरा विभागात बदल्या केल्या. बहुतांशी कर्मचारी घनकचरा विभागात हजर झाले. परंतु, क, फ प्रभागातील कर्मचारी आयुक्तांचा आदेश असुनही घनकचरा विभागात हजर न होता फेरीवाला विभागात आपले कर्तव्य करुन फेरीवाल्यांची पाठराखण करण्याचे कर्म पार पाडत आहेत.
बदली आदेश होऊनही जे सफाई कामगार घनकचरा विभागात हजर होणार नाहीत, त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश आयुक्त डाॅ. दांगडे यांनी वित्त विभागाला दिले आहेत. कोणत्याही सफाई कामगाराने राजकीय दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर महाराष्ट्र गैरवर्तणूक सेवा व शिस्त नियमाने कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मग या ठाणमांड्या कामगारांना पाठिंबा कोणाचा अशी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा… डोंबिवली-कल्याणमधील नाले गाळ, कचऱ्याने भरलेले; प्रशासन अद्याप ठेकेदार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
शहर स्वच्छतेसाठी पुरेसे सफाई कामगार रस्त्यावर नसल्याने आयुक्त दांगडे यांनी पालिकेच्या विविध विभाग, प्रभागात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून बदली कामगार घनकचरा विभागात वर्ग केल्यानंतर घनकचरा विभागाने या सफाई कामगारांच्या गरजेप्रमाणे विविध प्रभागात कर्तव्यासाठी नियुक्त्या करायच्या आहेत. घनकचरा विभागाचा आदेश डावलून प्रभाग स्तरावर कोणी कामगाराने सोयीप्रमाणे कर्तव्य लावून घेण्याचा प्रयत्न केला तर संबंधित कामगार, साहाय्यक आयुक्तावर कारवाई करण्याचा इशारा घनकचरा विभाग प्रमुख अतुल पाटील यांनी दिला आहे. तशी कारवाई त्यांनी केली आहे.
हेही वाचा… काटई गावात विवाहितेला कुटुंबीयांकडून बेदम मारहाण
बदली होऊन आलेले सफाई कामगार घनकचरा विभागाने आहे त्या प्रभागातच कर्तव्यावर नियुक्त केल्याने अनेक कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्ष एकाच प्रभागात सफाई कामगारांनी शिपाई म्हणून काम केल्याने त्यांचे फेरीवाले, मालमत्ता कर, बेकायदा इमले उभारणारे भूमाफिया यांच्याबरोबर ‘स्नेहा’चे संबंध आहेत. प्रभागातील शिस्तीचे वातावरण बिघडविण्यात, बजबजपुरी वाढविण्यात हे कामगार महत्वाची भूमिका बजावत असल्याच्या तक्रारी आहेत. हे आयुक्तांच्याही निदर्शनास आल्याने त्यांनी अशा सर्व कामगारांना मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा… ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; खोलीत अडकलेल्या पाचजणांची पालिकेच्या पथकाने केली सुटका
इतर विभागात शिपाई म्हणून काम केल्याने रस्त्यावर झाडू मारण्याची जबाबदारी हे कामगार टाळत होते. काही कामगार मोटारीतून कार्यालयात येतात. त्यांना रस्त्यावर झाडू मारणे कमीपणाचे वाटते. फेरीवाला हटाव पथक, साहेबाच्या दालनावर शिपाई म्हणून मिरविण्यात हे कामगार धन्यता मानतात.
२० दिवसांपासून ठाण मांडून
आयुक्त डाॅ. दांगडे यांनी २७ एप्रिल रोजी १० प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील १६ सफाई कामगारांना त्यांच्या मूळ घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश काढले. २० दिवस उलटले तरी कल्याण पश्चिमेतील क प्रभागातील संतोष भिमा जाधव, सुहास कांबळे, कांतिलाल अहिर, संभाजी म्हात्रे, दिनेश परमार, अनिल दोंदे, विजय पादारे आणि डोंबिवलीतील फ प्रभागातील अरुण किसन जगताप हे सफाई कामगार घनकचरा विभागात हजर झाले नाहीत. साहाय्यक आयुक्तांनी तातडीने या कामगारांना मुक्त न केल्याने इतर कर्मचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत. क प्रभागात संतोष जाधव, फ प्रभागात अरुण जगताप यांचे फेरीवाल्यांवर बरोबर ‘स्नेहसंपर्का’चे संबंध असल्याने या दोन्ही प्रभागातून फेरीवाले कायमचे हटविण्यात इतर कामगारांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत.
“ प्रभागात कामगारांची संख्या कमी आहे. क प्रभागातील बदली दोन कामगार रजेवर आहेत. बदली इतर कामगारांना आजच कर्तव्यातून मुक्त करुन त्यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मूळ घनकचरा विभागात पाठविण्यात येत आहे.” – तुषार सोनावणे, साहाय्यक आयुक्त, क प्रभाग.