कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी काँग्रेस नगरसेवकांमधील दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. विरोधी पक्षनेते पदाच्या वादातून सुरू झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर पुढे धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत पोहोचले. एकीकडे हा गोंधळ सुरू असताना शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे तब्बल ५२ विषय सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी अवघ्या २० मिनिटात मंजूर केले.
काँग्रेसचे नगरसेवक व विद्यमान विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी गेल्या आठवडय़ात शिवसेनेत प्रवेश केला. राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपदी मिरविण्याचा कोणताही अधिकारी नाही, अशी भूमिका काँग्रेस नगरसेवकांनी मांडली. तसेच राणे यांनी शिवसेनेच्या सदस्यांमध्ये बसावे, असा या नगरसेवकांचा आग्रह होता. असे असताना महापौर कल्याणी पाटील यांनी मात्र काँग्रेस नगरसेवकांची ही मागणी मान्य करण्यास हरकत नोंदवली. ‘राणे यांना विरोधी पक्ष नेतेपदी ठेवावे की नाही यासंबंधी आपणास कोकण विभागीय आयुक्तांकडून कोणतेही पत्र आलेले नाही. तसेच विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवरून न्यायालयात एक याचिका दाखल आहे. या संदर्भात आपण कोणताही निर्णय देऊ शकत नाही, अशी भूमिका महापौर पाटील यांनी घेतली. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक नवीन सिंग, जितेंद्र भोईर, उदय रसाळ, साबिर कुरेशी, नंदू म्हात्रे, सदाशिव शेलार आक्रमक झाले आणि त्यांनी महापौरांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. महापौरांविरोधात घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रत्युत्तर देऊ लागले. मनसेच्या नगरसेवकांनी महापौरांनी कायद्याचा आधार घेऊन विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी चालू ठेवली. त्यामुळे सभागृहात अभूतपूर्व गोंधळ सुरू झाला.
धक्काबुक्कीला प्रारंभ
या गोंधळात शिवसेनेचे नगरसेवक अरविंद मोरे यांनी विश्वनाथ राणे यांना विरोधी पक्षनेत्याच्या आसनावर बसवण्याचा प्रयत्न केला. राणे यांना आसनावर बसण्यास काँग्रेस नगरसेवक नवीन सिंग, नंदू म्हात्रे यांनी कडाडून विरोध केला. ‘तुम्ही कायद्याने बोला. तुम्हाला मी उत्तर देतो’ असे राणे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. नवीन सिंग व राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन त्यांच्यात धक्काबुक्की सुरू झाली. सुरक्षारक्षक तसेच अन्य नगरसेवक मध्ये पडल्याने अनर्थ प्रसंग टळला. या वेळी नंदू म्हात्रे व राणे यांच्यातही बाचाबाची झाली. महापौरांनी काँग्रेसच्या गोंधळी नगरसेवकांना सुरक्षारक्षकांमार्फत सभागृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अभूतपूर्व गोंधळ झाला. राणे व सिंग यांच्यात धक्काबुक्की सुरू असताना महापौर पाटील यांनी सिंग हे रिव्हॉल्व्हर घेऊन सभागृहात आले आहेत. त्यांना निलंबित करण्यात येत आहे,अशा प्रकारे ओरडू लागल्या. गदारोळ संपत नाही पाहून महापौरांनी सचिवांना कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. या गदारोळात विषय पत्रिकेवरील ४६ व प्रशासनाकडील सहा विषय असे एकूण ५२ विषय अवघ्या १५ मिनिटात चर्चेविना मंजूर करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा