कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांमधील पथदिव्यांची २६ कोटीची कामे घेण्यासाठी राजकीय आशीर्वाद असलेल्या ठेकेदारांमध्ये जोरदार चढाओढ लागली आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही कामे होणार असल्याने आपल्याच ठेकेदाराला हे काम मिळावे म्हणून काही राजकीय मंडळींकडून पालिका अधिकाऱ्यांवर जोरदार दबाव आणला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
२७ गावांमध्ये अनेक वर्षानंतर प्रथमच नवीन पथदिवे बसविण्याची कामे होणार आहेत. या कामांच्या माध्यमातून या भागात मत बँक तयार करण्याचा काही राजकीय मंडळींचा इरादा आहे. त्यामुळे ही पथदिव्यांची कामे करण्यास घेऊन त्या माध्यमातून प्रत्येक गावात आपला संपर्क वाढवून आपली मत बँक या भागात कशी तयार करता येतील या दृष्टीने काही राजकीय मंडळी हे काम आपल्याच ठेकेदाराला मिळावे यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत.
आणखी वाचा-कल्याणमधील आडीवली गावात इमारतीमधील दोन गटात राडा
ही कामे दर्जेदार पध्दतीची होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील नामवंत विद्युत ठेकेदार या स्पर्धेत उतरणे आवश्यक होते. परंतु, या निविदा प्रक्रियेतील अटीशर्ती काही ठराविक ठेकेदारांच्या हिताच्या करण्यात आल्याची चर्चा काही विद्युत ठेकेदारांमध्ये आहेत. ठाण्यात हजारो कोटीची पथदिव्यांची कामे करणाऱ्या एका नामवंत विद्युत कंपनीला या स्पर्धेतून बाहेर काढण्यात (मेक) आले आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातील एका वजनदार राजकीय पुढाऱ्याने आपल्या समर्थकाच्या माध्यमातून २७ गावातील पथदिव्यांची निविदा भरून हे काम आपल्यालाच मिळावे यासाठी वरिष्ठ स्तरावरून वजनदार राजकीय दबाव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
पथदिव्यांच्या कामासाठी सुमारे चार विद्युत ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. यामधील बहुतांशी निविदा या राजकीय पाठबळ असणाऱ्या ठेकेदारांच्या असल्याने स्थानिक विद्युत ठेकेदारांनी या कामांकडे पाठ फिरवली असल्याचे समजते. काही ठेकेदारांनी या वृत्ताला दुजोरा दिला. पालिका अधिकारी मात्र या निविदा प्रक्रियेमुळे गोंधळले आहेत. स्पर्धेतील ठेकेदारांना कामे मिळाली नाहीत तर तेथून टिकेची झोड आणि नामवंत विद्युत कंपन्या स्पर्धेबाहेर ठेवल्याने तेथूनही टीका होण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे.
अनेक वर्षानंतर २७ गाव हद्दीत होणारी पथदिव्यांची कामे योग्यरितीने केली नाहीत तर ठेकेदारांना गावकऱ्यांचा रोषाला सामोरे जावे लागेल. या भीतीने हे काम चांगल्या ठेकेदाराला मिळेल यादृष्टीने पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
शिळफाट्याचे पथदिवे
गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर बसविण्यात आलेले नवेकोरे पथदिवे मेट्रोच्या कामासाठी रस्त्यामधून काढण्यात आले आहेत. पत्रीपूल ते पलावा चौकापर्यंत हे पथदिवे आहेत. या पथदिव्यांचे होणार काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्ता एमएसआरडीसीचा असल्याने या पथदिव्यांवर त्यांचे नियंत्रण आहे, असे पालिकेकडून सांगण्यात येते. हे पथदिवे पालिकेने एमएसआरडीकडून घेऊन उपयोगिता असलेल्या भागात लावण्याची मागणी नागरिक करत आहेत. हे पथदिव्यांचे काम एका वजनदार राजकीय व्यक्तिच्या आशीर्वादाने करण्यात आले होते.
२७ गावांमधील पथदिव्यांची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामे सुरू केली जातील. दर्जेदार पध्दतीने ही कामे होतील याकडे पालिकेचा कटाक्ष असेल. -प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग.