मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरणे, त्यांची छाननी होऊन अंतिम उमेदवारांची यादी घोषित होणे आदी प्रक्रिया संपली असून आता प्रचाराची राळ उडायला सुरुवात होणार आहे. निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन विकास आघाडी, स्थानिक आघाडी असे विविध पक्ष उतरले असले तरी मुख्य लढत भाजप आणि शिवसेनेतच होत असून काँग्रेसनेदेखील काही भागात आव्हान निर्माण केले आहे.
निवडणुकीचा सुरुवातीचा काळ गाजला तो म्हणजे नगरसेवकांच्या पळवापळवीने. भाजप आणि शिवसेनेने राष्ट्रवादीचे बहुंताश नगरसेवक फोडून पक्षाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आणलेच, शिवाय काँग्रेसला मोठे खिंडार पाडले. या नगरसेवक पळवापळवीच्या अंतिम टप्प्यात एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या भाजप-शिवसेनेने एकमेकांच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांनाही पळवण्यास कोणतीही कसर बाकी सोडली नाही. त्यामुळे ही निवडणूक नगरसेवकांच्या पळवापळवीसाठी खास करून लक्षात ठेवली जाणार आहे.
२०१४ पर्यंतचा म्हणजेच महानगरपालिका स्थापनेपासून पुढील १२ वर्षांचा काळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचीच सत्ता होती आणि त्याआधीही नगर परिषदेच्या काळात काँग्रेसने आणि काँग्रेसप्रणीत आघाडीने या ठिकाणी वर्चस्व अबाधित ठेवले होते. या संपूर्ण कालावधीत भाजप आणि शिवसेनेचे अस्तित्व केवळ दखल घेण्यापुरतेच मर्यादित होते. नगर परिषद आणि महागरपालिकेचा सुरुवातीचा काळ पाहिला तर इथल्या राजकारणावर आगरी समाजाची जबरदस्त पकड होती. राजकारणाचे सुकाणू दुसऱ्यांच्या हाती असले तरी लोकप्रतिनिधींमध्ये आगरी समाजाचीच संख्या जास्त होती आणि आगरी समाज काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबतच असल्याने या ठिकाणी या दोन पक्षांचाच बोलबाला होता, परंतु गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलत गेलेली दिसून येते. बांधकाम क्षेत्र झपाटय़ाने विस्तारत गेल्याने या ठिकाणी शेकडो इमारती उभ्या राहिल्या. मुंबई आणि आसपासच्या भागातून या ठिकाणी अनेक जण स्थलांतरित झाले. यात मराठी भाषकांची संख्या काही प्रमाणात असली तरी मुख्य करून गुजराती आणि जैन समाज बहुसंख्येने मीरा-भाईंदरमध्ये स्थिरावला. साहजिकच इथला आगरी समाज आणि इतर मराठी भाषक समाजाची संख्या तुलनेने खूपच कमी झाली. मात्र या परिस्थितीतही जैन, गुजराती आणि मारवाडी समाजाची भाईंदरमधील मतपेढी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ताब्यात ठेवली होती आणि मीरा रोडमध्ये हा समाज काँग्रेसच्या बाजूने होता. मराठी मते फारच कमी असल्याने आणि शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने त्या काळात ताकद वाढविण्यासाठी फारसे प्रयत्न न केल्याने सेनेचा लोकप्रतिनिधींचा आकडा पाच ही संख्यादेखील पार करू शकत नव्हता. भाजपची परिस्थिती शिवसेनेपेक्षा बरी होती, परंतु सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी ती पुरेशी नव्हती.
मात्र २००९ पासून हे चित्र हळूहळू बदलत गेले. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मीरा-भाईंदरमध्ये दीड मतदारसंघ निर्माण झाले. मीरा-भाईंदर आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाचा अर्धा भाग. विधानसभा निवडणुकीत ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेनेने बाजी मारली, तर मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपचा अवघ्या साडे अकरा हजार मतांनी पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला खरे तर ही धोक्याची सूचना होती, परंतु दोन्ही पक्षाचे नेते गाफील राहिले आणि २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने जोरदार मुसंडी मारली, परंतु अवघी चार ते पाच मते कमी पडल्यामुळे युती सत्तेपासून दूर राहिली. मात्र २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या आलेल्या लाटेत दोन्ही काँग्रेस वाहून गेल्या. पाठोपाठ नगरसेवकांची फोडाफोड करत युतीने महापालिकेत आपली सत्ता स्थापन केली.
दोन वर्षे अधूनमधून सुरू असलेल्या कुरबुरी वगळता युतीने महापालिकेत सुखाने संसार केला. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर युतीत बिघाड सुरू झाला. मुंबईच्या निवडणुकीत युतीने काडीमोड घेतला. भाजपने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये युती नको ही मागणी जोर धरू लागली. इथला बहुसंख्येने असलेला गुजराती, जैन आणि मारवाडी तसेच उत्तर भारतीय समाज भाजपसोबत असल्याने मीरा-भाईंदरमध्ये एकहाती सत्ता स्थापन करणे सहज शक्य असल्याचा साक्षात्कार भाजपच्या स्थानिक नेत्यांना होऊ लागला आणि युती तुटली. त्यामुळे कालपर्यंत सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप आणि शिवसेना सध्या एकमेकांना अक्षरश: पाण्यात पाहू लागले आहेत. महापालिकेच्या ९५ जागांपैकी ७० जागा जिंकण्याची गर्जना करत भाजप निवडणुकीत उतरली. सुरुवातीच्या काळात भाजपला हे सहज शक्य असल्याचेच चित्र दिसत होते. त्यामुळे शिवसेनादेखील काहीशी थांबा आणि पाहा या भूमिकेत होती.
निवडणुकीच्या प्रभाग रचनेनंतर मात्र परिस्थितीत फरक पडू लागला. भाजपला या रचनेचा सर्वाधिक फटका बसला. त्यांचे अनेक नगरसेवक एकाच प्रभागात आल्याने त्यांना सामावून कसे घ्यायचे याची चिंता भाजपला पडू लागली. त्यामुळे शिवसेनेला आशेचा किरण दिसू लागला. राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी कोणीच वाली उरला नसल्याने भाजपने राष्ट्रवादीचे काही नगरसेवक गळाला लावले. मात्र शिवसेनेने यात आघाडी घेतली. योग्य व्यूहरचना केली तर भाजपला खिंडीत पकडता येईल याची जाणीव शिवसेनेला झाली आणि त्यांनीदेखील राष्ट्रवादी आणि काँग्रेस फोडायला सुरुवात केली. त्यामुळे सेनेची ताकद वाढू लागली.
सेना केवळ ताकद वाढवून स्वस्थ बसायला तयार नव्हती तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळू द्यायची नाही, असा निर्धारच शिवसेनेकडून करण्यात आला. यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांना पक्षात घेऊन शिवसेनेने खेळी खेळण्यास सुरुवात केली. या खेळीनंतर सत्तेपर्यंत पोहोचू शकतो, असा विश्वास शिवसेनेत निर्माण झाला आणि त्यांनी मग थेट भाजपवरच हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. भाजपचे बलवान परंतु पक्षात नाराज असलेल्या नगरसेवकांवर सेनेने आपले सर्व लक्ष केंद्रित केले आणि भाजपचे नगरसेवक फोडायला सुरुवात केली. हा भाजपला मोठा हादरा होता. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने भाजपचे दोन नगरसेवक फोडले शिवाय मुदत संपल्यावरही भाजपकडून अधिकृत उमेदवारी न मिळालेल्या भाजपच्या गटनेत्याला पुरस्कृत करून शिवसेनेने भाजपवर जोरदार कुरघोडी केली. त्यामुळे अनेक ठिकाणी मूळच्या शिवसैनिकांना डावलून सेनेने बाहेरच्यांना उमेदवारी दिली. या बाहेरच्यांच्या जीवावर आणि वेळ पडली तर काँग्रेसशी हातमिळवणी करून महापालिकेत सत्ता स्थापन होईल, असा आत्मविश्वास शिवसेनेला वाटू लागला आहे. एवढय़ा मोठय़ा पडझडीनंतरही भाजप मात्र स्वबळावर सत्ता मिळविण्यावर ठाम आहे. त्यामुळे सत्तेसाठी दोन्ही पक्षात सुरू असलेल्या या साठमारीत कोण बाजी मारतो हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.