डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौकात मंगळवारी रात्री तरुणांच्या दोन गटात एकमेकांना खाणाखुणा करण्यावरुन जोरदार राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी रामनगर पोलीस ठाण्यात केल्या आहेत.पोलिसांनी सांगितले, दत्तनगर चौकातील नीलेश चायनिज काॅर्नर येथे मंगळवारी रात्री साडे दहा वाजता दीपेश भानुशाली हे त्याच्या मित्रांसोबत चायनिज खात उभे होते. त्यावेळी त्यांच्या घरा समोर राहणारा चिन्मय भिसे हा त्याच्या मित्राच्या दुचाकीवरुन चालला होता. त्यावेळी भिसे याच्या सांगण्यावरुन दुचाकी स्वाराने दुचाकी मागे वळवून तो दीपेश यांच्या दिशेने आला व मला तू काय म्हणालास असे बोलून शिवीगाळ करुन निघून गेला.
हेही वाचा >>>डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त; रस्ते, पदपथ मोकळे असल्याने पादचाऱ्यांकडून समाधान
चिन्मयने त्याचा मामा प्रशांत सावर्डेकर, भाऊ सागर यांना घरी जाऊन घडला प्रकार सांगून त्यांना घटनास्थळी आणले. यावेळी दीपेश आणि भिसे यांच्यात शाब्दिक बोलाचाली होऊन तिघांनी मिळून आपणास मारहाण केली असे दीपेशने तक्रारीत म्हटले आहे. दीपेशने चिन्मय भिसे, सागर भिसे, प्रकाश सावर्डेकर यांच्या विरुध्द तक्रार केली आहे.अनिल भिसे यांनी दीपेश भानुशाली, सुनील नायक यांनी आपणास मारहाण केली आहे, अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. आपण रस्त्याने जात असताना दीपेश आपणास काही इशारे करत होता. आपण त्याच्या जवळ जाऊन खाणाखुणा कसल्या करतोस म्हणून विचारण्यास गेलो असता आपणास दोघांनी मिळून मारहाण केली, असे अनिलने तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल करुन तपास सुरू केला आहे. रात्री दहा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा असताना पोलिसांच्या आशीर्वादाने शहराच्या विविध भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत चायनिज गाड्या सुरू असताना डोंबिवलीतील नागरिकांच्या तक्रारी आहेत.