कल्याण : पालिका अधिकारी, ठेकेदार यांच्या बेजबाबदार, निष्काळजीपणामुळे दरवर्षी कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमध्ये पडून अनेकांची जीव जातात. अशा प्रकरणात ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यामुळे खड्डे हा प्रकार कायमचा संपविण्यासाठी खड्डे अपघात मृत्यूप्रकरणी संबंधित कामाचा ठेकेदार, अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शासनाकडे केली आहे.
गेल्या आठवड्यात कल्याण पूर्वेतील मलंग रस्त्यावर व्दारली गावाजवळ दुचाकीवरुन जाताना खड्डा चुकवित असताना सूरज गवारी या तरुणाचा तोल जाऊन तो खाली पडला. बाजुने जात असलेला सिमेंट वाहू वाहन अंगावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची गायकवाड यांनी गंभीर दखल घेतली आहे.
हेही वाचा… कल्याण-डोंबिवली पालिकेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे निधन
खड्ड्यांच्या विषयावरुन गायकवाड यांनी शासनाकडे तक्रार केली आहे. विधीमंडळ अधिवेशनात खड्ड्यांना जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि खड्ड्यात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास ठेकेदार, अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत, असे आ. गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा… कर्जत-कसारा ते सीएसएमटी लोकल १५ मिनीट उशिराने
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पावसाळापूर्वीची खड्डे बुजविण्याची कामे ठेकेदारांकडून योग्यरितीने केली जात नाहीत. पालिका अधिकारी या कामांवर देखरेख ठेवत नाहीत. वरवरची मलमपट्टी करुन ठेकेदार खड्डे भरुन देयके काढून मोकळे होतात. मुसळधार पाऊस सुरू झाला की हे रस्ते खराब होतात. या रस्त्यांवरुन वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात होते. कोट्यवधी रुपये या कामांसाठी प्रस्तावित करुनही ही कामे दर्जेदार केली जात नाहीत. याचीही चौकशी झाली पाहिजे, असे गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा… तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
इतर शहरांमध्ये रस्ते आहेत. तेथे असे प्रकार नाहीत. मग कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दरवर्षी खड्डे का पडतात, असा प्रश्न गायकवाड यांनी केला आहे. दरवर्षी खड्ड्यांमुळे पालिका हद्दीत दोन ते तीन जणांचे जीव जातात. अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याने हे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे यापुढे खड्ड्यांमुळे अपघात झाल्यावर ठेकेदार, अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.
मलंग रस्त्यावरील खड्डे अपघातानंतर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील खड्डे भरण्याची कामे सुरू केली आहेत. खडी टाकून सुस्थितीत खड्डे भरले जात आहेत.