कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेतील बनावट रस्ते नस्ती घोटाळा उघडकीला आल्यानंतर प्रशासनाने नस्तींचा हाताने होणारा प्रवास कायमचा थांबविण्यासाठी ई ऑफिस प्रणाली अंमलबजावणीच्या जोरदार हालचाली केल्या. या प्रणालीच्या माध्यमातून चार विभागांमध्ये ऑनलाइन नस्ती पाठविण्याचा प्रयोग यशस्वी झाला. येत्या आठवडाभरात पालिकेतील २५ कार्यालये ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून जोडून नस्ती शिपाई, कर्मचारी, ठेकेदारांच्या माध्यमातून फिरविण्याचा प्रवास कायमचा बंद होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी रस्ते बांधकाम नस्तींचा साडेसात कोटींचा घोटाळा उघडकीला आणला. त्यांना हाताने नस्ती एकमेकांच्या दालनात मंजुरीसाठी नेण्याच्या पद्धतीमुळे नस्ती गहाळ होत असल्याचे लक्षात आले होते. आयुक्त दांगडे यांनी ई ऑफिस प्रणाली गतिमानतेने अंमलात आण्याच्या सूचना संगणक विभागाला केल्या.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची बॅनरबाजी

संगणक विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय थोरात यांनी ई ऑफिस प्रणालीची आज्ञावली (साॅफ्टवेअर) तयार केली. नस्ती हातळणाऱ्या कर्मचाऱ्याचे ई-मेल तयार केले. त्यांचे गुप्त संकेतांक, लाॅगिन ओळख तयार करून घेतली. प्रायोगिक तत्वावर ई ऑफिस प्रणाली राबविण्यासाठी संगणक विभाग, बाजार परवाना, विधी विभाग आणि बांधकाम विभाग या विभागांची निवड करून नस्ती आदान प्रदान पथदर्शी प्रकल्प यशस्वीपणे राबविला. या प्रणालीत नस्तीचा मंजुरीचा प्रवास प्रत्येक मंचकावर होत ती नस्ती ऑनलाइन माध्यमातून अधीक्षक, उपायुक्त, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांच्या मंचकावर मंजुरीसाठी गेली. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे येत्या आठवड्यात पालिकेतील सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांचे ई-मेल तयार करून ई ऑफिस प्रणाली प्रभावीपणे अंमलात आणली जाईल, असे थोरात यांनी सांगितले. अनेक वर्ष पालिकेतील नस्ती हाताळणीचे काम नगरसेवक, ठेकेदारच करत होते. नस्ती गहाळ करणे, स्पर्धकाच्या नस्तीमधील कागद फाडून टाकण्याचे प्रकार घडत होते.

ई ऑफिस प्रणाली

या प्रणालीमुळे नस्तीचा प्रवास ऑनलाइन माध्यमातून होईल. नस्ती एका दालनातून दुसऱ्या विभागात कधी, कोणत्या अधिकाऱ्याच्या मंचकावर गेली आहे हे वेळ, काळप्रमाणे समजणार आहे. नस्तीची विभागातील स्थिती काय आहे. हे बसल्या जागी अधिकाऱ्यांना कळणार आहे. अधिकाऱ्याला प्रवासात असताना आपल्या लॅपटाॅपवरून काम करावेसे वाटले तर तो नस्ती मंजूर आणि मार्गी लावण्यासाठी तेथूनही प्रयत्न करू शकतो. या पद्धतीमुळे कामात गतिमानता येईल. नस्ती मानवी पद्धतीने हाताळताना जे गैरप्रकार होत होते. ते पूर्णपणे थांबतील, असे आयुक्त डाॅ. दांगडे यांनी सांगितले.

हेही वाचा – कल्याणमध्ये अल्पवयीन तरुणीवर सामुहिक बलात्कर करणारे चार जण अटक

“ई ऑफिस प्रणालीमुळे नस्तींचा मानवी हातळणीचा प्रवास थांबेल. नस्ती ऑनलाइन माध्यमातून पाठविण्यात येणार असल्याने ती नस्ती कोणत्या मंचकावर, तेथील त्या नस्तीची स्थिती कळणार आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येईल. प्रवासातही काम करण्याची सोय यामुळे उपलब्ध होणार आहे.” असे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे म्हणाले.

“ई ऑफिस प्रणालीचा चार विभागांमधील पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला आहे. येत्या आठवड्यात तो सर्व विभागांमध्ये लागू होईल.” असे संगणक विभाग, अतिरिक्त आयुक्त, धनंजय थोरात म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Files will be sent online in kalyan dombivli mnc ssb