कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांच्या पुढील निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना गुरूवारी जाहीर करण्यात आली. बदलापुरातील प्रभाग रचनेत लक्षणीय बदल झाल्याचे दिसून आले आहेत. तर अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभाग रचनेत विशेष बदल झालेले नाहीत. अनुसूचित जाती, जमातीच्या लोकसंखेच्या निकषानुसार प्रभाग आरक्षणाचे चित्रही स्पष्ट झाले आहे. मात्र त्यावर अंतिम मोहर लवकरच लागेल. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
एप्रिल २०२० वर्षात मुदत संपलेल्या कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू होण्याला आता दोन वर्ष उलटून गेले आहेत. त्यामुळे आता माजी लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. गेल्या महिन्यात प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना आणि हकरती मागवल्यानंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात सूचना आणि हरकतींवर सुनावणी पार पडली होती. त्यानंतर गुरूवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर ११३ हरकती नोंदवल्या गेल्या होत्या. तर अंबरनाथच्या प्रारूप प्रभाग रचनेवर ६४ हरकती नोंदवल्या गेल्या. कुळगाव बदलापूर नगरपालकेच्या अंतिम प्रभाग रचनेत लक्षणीय बदल दिसून आले आहेत. अंतिम प्रभाग रचनेमुळे सर्वपक्षीयांना कमी अधिक प्रमाणात फायदा आणि नुकसान सहन करावे लागणार आहेत. बदलापुरात नव्या प्रभागांची संख्या २४ असून दोन सदस्यीय प्रभागांची संख्या २३ तर तीन सदस्यीय प्रभागांची संख्या एक असणार आहे. बदलापुरात नगरसेवकांची संख्या ४७ वरून ४९ वर पोहोचली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रारूप आणि अंतिम प्रभाग रचनेत विशेष बदल दिसून आले नाहीत. पाच ते सहा प्रभागात अनुसूचित जातीच्या प्रगणक गटांची अदलाबदल झाल्याने प्रभाग आरक्षणावर काही अंशी परिणाम होऊ शकतो. मात्र प्रभाग आरक्षण सोडतीनंतरच हे चित्र स्पष्ट होण्याची आशा आहे. अंबरनाथ नगरपालिकेची सदस्यसंख्या ५७ वरून ५९ वर पोहोचली आहेय तर प्रभागांची संख्या २९ वर पोहोचली आहे. यातील एक प्रभाग तीन सदस्यीस असणार असून इतर प्रभाग दोन सदस्यीय असणार आहेत.
आरक्षणाचे चित्रही जवळपास स्पष्ट
प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता लोकसंख्येच्या आधारावर दोन्ही शहरांमध्ये प्रभाग आरक्षणाचे आडाखे बांधले जात आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर उतरत्या क्रमाने पहिल्या प्रभागांमध्ये आरक्षण असेल असे अंदाज बांधत माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात प्रभाग आरक्षणावरही शिक्कामोर्तब होईल.