ठाणे – विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आगाऊ शुल्क आकारुन काही महिन्यात अचानक शिकवणी बंद केल्याचा प्रकार ठाण्यातील जांभळी नाका बाजार पेठेतील सुभाषचंद्र रोड परिसरात असलेल्या एका शैक्षणिक संस्थेत घडला आहे. अभियांत्रिकी अभ्यासाचे २०० हून अधिक विद्यार्थी याठिकाणी शिकवणी घेत होते. या शैक्षणिक संस्थेने अचानक शिकवणी बंद करुन ३ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सर्व पालकांनी एकत्रित येत शैक्षणिक संस्थेविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ठाणे नगर पोलिसांनी या शैक्षणिक संस्थेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जांभळी नाका बाजारपेठेत २०१३ पासून एक शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेमध्ये अकरावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या पूर्व तयारीची (आयआयटी आणि जेईई) शिकवणी दिली जात होती. या संस्थेत एप्रिल २०२४ वर्षात २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. अकरावी आणि बारावी असे दोन वर्षांसाठी या संस्थेकडून सहा लाख शुल्क आकारले जात होते. परंतु, या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रवेश परिक्षा घेतली जात होती. त्यात, ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील त्यांना शुल्कामध्ये सवलत दिली जात होती. २५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे वर्ग सुरळित सुरु होते. त्यानंतर, या संस्थेची पुण्यात असलेली शाखा काही तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आली. तेव्हा पालकांनी खात्री करण्यासाठी ठाणे शाखेला भेट दिली. त्यावेळी या शाखेवर कोणताही परिणाम होणार नाही असे तेथील कर्मचाऱ्यांकडून पालकांना सांगण्यात आले. परंतु, काही दिवसांतच पालकांना समाजमाध्यमांवर ठाणे संस्थेच्या एका बैठकीची चित्रफीत प्रसारित झाली. त्या चित्रफितीत ठाणे संस्थेतील एक शिक्षक संस्थेच्या संचालकांना वेतन वेळेवर मिळत नसल्याबाबत जाब विचारला असता, त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. त्यावेळी याप्रकरणाबाबत सर्व पालकांनी ठाणे शाखेच्या प्रमुखांना विचारले, तेव्हा ठाणे संस्थेची आर्थिक परिस्थिती वाईट असून पुढे शिकवणी चालवू शकत नसल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा – ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
तुम्हाला याबाबत जाब विचारायचा असेल तर, संचालकांना संपर्क साधा असे प्रमुखाने पालकांना सांगितले. परंतु, पालकांनी संचालकांशी वारंवार संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला. तेव्हा ठाणे संस्थेकडून पर्याय म्हणून दिल्लीच्या शाखेत आपल्या मुलांचा ५ हजार रुपये भरुन प्रवेश घेतला तर, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी मिळेल. परंतु, ठाणे संस्थेवर विश्वास ठेऊन आधीच आर्थिक नुकसानीचा फटका बसला असताना आता पुन्हा हा फटका बसायला नको म्हणून पालकांनी संस्थेच्या या पर्यायाला विरोध केला. यासर्व प्रकरणात २०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तसेच आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी या शैक्षणिकसंस्थे विरोधात सर्व पालकांनी एकत्रित येत ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.