कल्याण – मागील काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नाहीत. डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी अमुदान कंपनीत स्फोट होऊन १६ कामगार मृत्यू पावले. एवढी भीषण परिस्थिती जिल्ह्यात असताना शिवसेना नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाई डोंंबिवली एमआयडीसीत नाहीच, पण ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नसल्याने मुरबाडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने पालकमंत्री शंभुराज देसाई यांना शोधा आणि गावठी कोंंबडा आणि वळगणीचे मासे (पहिल्या पावसातील माळरानावरील मासे) मिळवा, असे फलक मुरबाड शहरात लावल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-नाशिक महामा्र्गावर वाहनांची तुफान वाहन कोंडी होत आहे. या महामार्गावर वासिंद, खातिवली, आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेली कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावरील नाशिक महामार्गावरील उड्डाण पूल मागील तीन वर्षांपासून रखडला आहे. या पूलावरील एका मार्गिकेतून वाहने धावतात. त्यामुळे माल वाहतूकदार, प्रवासी हैराण आहेत. हे सर्व विषय का रखडले आहेत याची माहिती घेऊन त्यांना कामाला लावणे हे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांचे काम आहे. पण पालकमंत्री देसाई ठाणे जिल्ह्यात फिरकत नसल्याने राजकीय पक्षांसह नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास विश्वासतले म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांना साताऱ्याचे असूनही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना ठाणे जिल्ह्याचा विभागवार दौरा करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची, त्या मार्गी लावण्यासाठी सूचना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
मुरबाड तालुक्यात आदिवासी भागात रस्ते, जवळ आरोग्याच्या सुविधा नसल्याने आदिवासी लोकांना डोली करून रुग्णांना मुरबाड येथे पायपीट करत आणावे लागते. आदिवासी, ग्रामीण भागात कुपोषण आहे. हे प्रश्न शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री देसाई यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पालकमंत्री जि्ल्ह्यात फिरकत नसल्याने जिल्ह्यातील नागरी समस्या वाढत आहेत, असे मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील अनेक नागरिकांना ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे हेही माहीत नाही. आपला पालकमंत्री कोण रे दादा, असे लोक विचारत आहे, असे वाघचौडे यांनी सांगितले.
हेही वाचा – मुंबई-नाशिक महामार्ग ‘खड्ड्यात’; दोन तासांचे अंतर कापण्यासाठी सहा तास खोळंबा
जिल्हा विकास नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती लावली म्हणजे जिल्ह्यातील समस्या सुटल्या असे होत नाही. यासाठी जिल्ह्याचा दौरा करावा लागतो. पावसाळा सुरू झाला आहे. ठाणे जिल्ह्याच्या गावोगावी अनेक समस्या आहेत. त्या समजून घेण्यासाठी पालकमंत्री फिरत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
मुरबाडमधील भर बाजारपेठेत पालकमंत्री देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा बक्षीस मिळवा असा फलक लागल्याने जिल्हाभर हा विषय चर्चेचा झाला आहे.