कल्याण- कल्याण डोंबिवली शहरे प्लास्टिक मुक्त करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून पालिकेतर्फे विशेष अभियान सुरू आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करण्यास व्यापारी, दुकानदार, फेरीवाल्यांना मज्जाव आहे. अशा परिस्थितीत दुकानात बंदी असलेल्या प्लास्टिकचा चोरुन साठा करून त्या ग्राहकांना विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिकेच्या घनकचरा विभागाच्या पथकाने कारवाई केली. अशा व्यापाऱ्यांकडून एकूण ५५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.
गेल्या दोन वर्षापासून घनकचरा विभागाचे माजी उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांच्या पुढाकाराने प्लास्टिक मुक्त अभियान सुरू आहे. प्लास्टिक मुक्तीसाठी घनकचरा विभागाने अनेक उपक्रम, कारवाईच्या मोहिमा राबविल्या. प्रतिबंधित प्लास्टिक वापराच्या संदर्भात पालिका किती कठोर आहे हे दाखविण्यासाठी तत्कालीन उपायुक्त कोकरे यांनी पालिकेतील एका कार्यक्रमात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केला म्हणून एका महिला उपायुक्ताला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला होता.
कोकरे यांची बदली झाल्याने आता उपायुक्त पाटील यांच्याकडे घनकचरा विभागाचा पदभार आहे. उपायुक्त पाटील यांनीही प्लास्टिक निर्मूलना संदर्भात कठोर कारवाईच्या सूचना कारवाई पथकाला दिल्या आहेत. अनेक दुकानदार चोरुन प्लास्टिकचा वापर करून ग्राहकाला त्या पिशवीतून सामान देतात. काही फेरीवाले टोपली खालील, जवळील आडबाजुच्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या लपून ठेवतात. ग्राहकाला त्या पिशव्यांमधून सामान देत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्लास्टिक वापर करणाऱ्या घाऊक व्यापारी, किरकोळ दुकानदार फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी. त्यांच्याकडून दंड वसूल करावा. दंड भरण्यास व्यापारी तयार नसेल तर त्याच्यावर कायदेशीर करावी, अशा सूचना उपायुक्त पाटील यांनी पथकाला दिल्या आहेत.
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, बिर्ला महाविद्यालय रस्ता परिसरातील ब प्रभाग हद्दीतून प्लास्टिक निर्मूलन कारवाई पथकाने दुकानदारांवर कारवाई करून पाच हजार रुपये तर शिवाजी चौक, महमद अली चौक, लक्ष्मी मार्केट, झुंझारराव बाजार परिसरातून २० हजार रुपये दंड वसूल केला. डोंबिवलीत फ प्रभाग हद्द, एमआयडीसी, रेल्वे स्थानक परिसरात पथकाने २१ ठिकाणी भेटी देऊन २० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त केले, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.
कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई
सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यावर पालिकेने निर्बंध आणले आहेत. कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने विभागवार प्रत्येक इमारत, चाळी, झोपडपट्टी भागात घंटागाडी सुरू केली आहे. त्यामुळे आपल्या दारात आलेल्या घंटागाडीत कचरा टाका. रस्त्यावर कचरा फेकू नका असे आवाहन पालिकेकडून सतत केले जाते. तरीही काही रहिवासी रस्त्यावर कचरा फेकतात. अशा कल्याण, डोंबिवलीतील १२ रहिवाशांवर घनकचरा विभागाच्या आरोग्य निरीक्षकांनी दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून एकूण चार हजार रुपये दंड वसूल केला आहे. टिटवाळा, मांडा, डोंबिवलीत आयरे, राजाजी रस्ता भागात ही कारवाई करण्यात आली.
कल्याण, डोंबिवली शहरांमधून प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर बहुतांशी कमी झाला आहे. तरीही काही दुकानदार चोरुन बंदी प्लास्टिकचा वापर करतात. शहरे कचरा मुक्तीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. शहर प्लास्टिक मुक्त करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. -अतुल पाटील उपायुक्त, घनकचरा विभाग