ठाणे : महापालिका क्षेत्रातील महामार्गांसह अंतर्गत भागात अनेक ठिकाणी मास्टीक पद्धतीने तयार करण्यात येणारे रस्ते गुळगुळीत होऊन अपघात होऊ नयेत, यासाठी अशा रस्त्यांवर बारीक खडी टाकली जात आहे. परंतु या रस्त्यावरील खडी रस्त्यावर इतरत्र पसरून अनेक ठिकाणी बारीक खडी जमा झाल्याचे थर दिसून येत आहे. या खडीवरून दुचाकी घसरण्याचे प्रकार घडत असून याठिकाणी मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडतात. या खड्ड्यांमधून वाट काढताना ठाणेकरांच्या नाकीनऊ येते. तसेच जीवघेणा अपघात होण्याची शक्यता असते. याचमुद्द्यावरून पालिकेच्या कारभारावर टीका होते. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने यंदा पावसाळ्यापूर्वी शहर खड्डे मुक्त करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार राज्य शासनाकडून मिळालेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते नुतनीकरणाची कामे करण्यात येत आहेत. यामध्ये सिमेंट काँक्रीट, मास्टीक आणि डांबरीकरण अशा पद्धतीने रस्ते कामे करण्यात येत आहे. मास्टीक पद्धतीने तयार करण्यात येणारे रस्ते गुळगुळीत असतात. पावसाळ्यात अशा रस्त्यांवरून दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासन असे रस्ते तयार करताना विशेष काळजी घेताना दिसून येत आहे. या रस्त्यांवर बारीक खडीचा थर टाकला जात आहे. दुपारच्या वेळेत डांबर तापल्यानंतर आणि सततच्या वाहतुकीमुळे ही खडी रस्त्यावर चिकटून बसते. असे असले तरी काही खडी चिकटून बसत नसून ती रस्त्यावर इतरत्र पसरत आहे. ही खडी रस्त्याकडेला जमा होत आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत देवीचापाडा खाडी किनारी ४३ एकरच्या ‘सहली’च्या आरक्षणावर चार हजार बेकायदा चाळी, खारफुटीची बेसुमार कत्तल

शहरातील मुंबई-नाशिक महामार्ग, कळवा खाडीपूल परिसर, तसेच शहरातील अंतर्गत भागांमध्ये हे चित्र दिसून येते. या खडीवरून दुचाकी घसरण्याचे प्रकार घडत असून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. असे अपघात टाळण्यासाठी पालिकेने रस्त्यांची साफसफाई करून ही खडी बाजुला काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Story img Loader