लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका बाजार परवाना विभागाची परवानगी न घेता उघड्यावर मटण विक्री करणाऱ्या २२ विक्रेत्यांकडून बाजार परवाना विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ३८ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात उघड्यावर मटण विक्री दुकाने चालविली जातात, अशा दुकानांची बाजार परवाना विभागाने तपासणी सुरू केली आहे.
ज्या विक्रेत्यांकडे पालिकेच्या बाजार परवाना विभागाचा परवाना नसेल, त्यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे, असे मालमत्ता आणि बाजार परवाना विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार मानवी आहारासाठी योजलेल्या ज्या जनावरांच्या मांसाची विक्री केली जाते. अशा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी पालिकेच्या बाजार परवाना विभागाचा परवाना घेणे आणि तो विहित वर्षाच्या कालावधीत नूतनीकरण करणे हे विक्रेत्याचे काम आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत अनेक ठिकाणी मटण विक्रेते बाजार परवाना विभागाचा परवाना न घेता मटण विक्री करत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे विक्रेत्यांची आता बाजार परवाना विभागाने प्रभाग हद्दीप्रमाणे बाजार परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली तपासणी सुरू केली आहे.
आणखी वाचा-“कोण पहात असेल, नसेल…बाळासाहेब, दिघेसाहेब हा सोहळा पहात आहेत”… मुख्यमंत्र्यांचे उद्गार
गेल्या आठवड्यात पालिका हद्दीतील २२ मटण विक्रेत्यांची दुकाने तपासण्यात आली. त्यामधील बहुतांश विक्रेत्यांकडे पालिकेचा बाजार परवाना आढळून आला नाही. त्या विक्रेत्यांकडून ते व्यवसाय करत असलेल्या तारखेपासून दंड आकारण्यात आला. या विक्रेत्यांकडून एकूण ३८ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या विक्रेत्यांना पालिकेचा परवाना घेण्याची सूचना करण्यात आली आहे, असे साहाय्यक आयुक्त ठाकूर यांनी सांगितले.
पालिका हद्दीत उघड्यावर, गाळ्यांमध्ये मटण विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या व्यवसायाची बाजार परवाना विभागाच्या माध्यमातून तपासणी सुरू केली आहे. ज्या विक्रेत्यांनी परवाना घेतलेला नाही. त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. त्यांना परवाना घेण्याचे सूचित केले जात आहे. -वंदना गुळवे, उपायुक्त, बाजार परवाना विभाग.