जादूटोण्याच्या संशयावरून मुरबाड तालुक्यातील केरवेळे गावातील एका ७५ वर्षांच्या व्यक्तीला आगीतून चालायला लावल्याचा धक्कादायक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. लक्ष्मण भावार्थे असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून ते या प्रकारात जखमी झाले आहेत. त्यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गावातील नऊ व्यक्तींविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी, ४ मार्च रोजी रात्री मुरबाडच्या केरवेळे गावात जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने जागरण सुरू असताना त्यातील काही व्यक्ती थेट लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात शिरले. त्यांनी लक्ष्मण भावार्थे यांना ओढून कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले. जादूटोणा आणि करणी करण्याच्या संशयावरून त्यांना जबरदस्तीने आगीवर नाचायला लावले. याबाबतची एक चित्रफीत प्रसारित होत असून त्यात काही तरुण भावार्थे यांना ओढून निखाऱ्यावर चालवत आहेत. पुढे. त्यांना त्या निखाऱ्यावर पाडण्यातही आल्याचे दिसते आहे. यावेळी भावार्थे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला फोड आले असून पाठीवरही भाजले आहे. या प्रकारानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यातील नऊ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader