येथील जेल तलाव समोरील पोलीस वसाहतीतील इमारतीत शनिवारी सकाळी महावितरणाच्या मीटर बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत ३६ मीटर बॉक्स जाळून खाक झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी लागलीच धाव घेऊन आग पूर्णपणे विझवली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ठाणे पश्चिम येथील जेल तलाव परिसरात पोलीस वसाहत आहे. या वसाहतीतील इमारत क्रमांक चार मध्ये असणाऱ्या महावितरणाच्या मीटर बॉक्सला शनिवारी सकाळी १०.३०च्या सुमारास आग लागली होती. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांकडून लागलीच शहर आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे याबाबतची तक्रार नोंदविण्यात आली होती. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, महावितरणाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे. मात्र या आगीत इमारतीतील ३६ विजेचे मीटर बॉक्स पूर्णपणे जळून खाक झाल्याने इमारतीतील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. इमारतीतील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु असल्याची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.