लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील पूर्व भागातील नांदिवली पंचानंद रस्त्यावरील एका सोसायटीच्या तळ मजल्यावर असलेल्या गाळ्यातील गादी कारखान्याला शनिवारी दुपारी आग लागली. दुकानात कापूस, कापडाचे गठ्ठे असल्याने आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले. गादी कारखाना आगीत जळून खाक झाला.

नांदिवली रस्त्यावरील नवसंकल्प इमारतीच्या तळमजल्यावर व्यापारी गाळे आहेत. त्यामध्ये गादी, उशा तयार करण्याचा कारखाना आहे.आग लागताच आजुबाजुच्या व्यापाऱ्यांनी बादलीने पाण्याचा मारा करून आग विझविण्याचे प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न थांबिवले. स्थानिकांनी पालिका अग्निशमन दलाला कळविल्यानंतर काही वेळात जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कारखाना जळून खाक झाला होता. कारखान्याच्या दरवाजाजवळ असलेल्या गाद्या आणि काही कापडाचे गठ्ठे पादचारी, जवळच्या व्यापाऱ्यांनी ओढून बाहेर काढल्याने दुकानातील काही सामान वाचविण्यात यश आले.

आणखी वाचा-ठाण्यातील तीन चौकात उन्नत मार्गिकेचा प्रस्ताव

अग्निशमन जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा सुरू करून आग इतरत्र पसरणार नाही याची काळजी घेतली. आगीवर नियंत्रण आणले. आगीचे नेमके कारण अद्याप समजु शकलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळेच आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader