ठाणे : येथील नौपाडा भागात एका सहा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका घरात देव्हाऱ्याला आग लागल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. ही आग मोठ्याप्रमाणत असल्यामुळे खिडकीद्वारे तिसऱ्या मजल्यावील खिडकीत ठेवलेल्या कागदाच्या गठ्ठ्याला लागली. या आगीच्या धुराचे लोट मोठ्याप्रमाणात परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतिही जिवीत हानी झालेली नाही.

नौपाडा भागात असलेल्या विष्णूनगर परिसरात एक सहा मजली इमारत आहे. या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील एका रूममध्ये सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास  देव्हाऱ्याला आग लागली होती. हा देव्हारा खिडकीजवळ होता. त्यामुळे खिडकीद्वारे आग तिसऱ्या मजल्यावरील खिडकीमध्ये ठेवलेल्या कागदाच्या गठ्यांना लागली. त्यामुळे आग आणखी मोठ्याप्रमाणात पसरली. या आगीच्या धुराचे लोट मोठ्याप्रमाणात परिसरात पसरले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी यासीन तडवी आणि कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. या आगीत दुसऱ्या मजल्यावरील घरातील देव्हारा, कपाट, काही साहित्य तसेच काही इलेक्ट्रिक वाहिन्या पूर्णपणे जळाल्या आहेत. या घरात वृद्ध दांपत्य राहतात त्यांना धुराचा त्रास होऊ लागल्यामुळे बाजूच्या घरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्थलांतर केले होते. सुदैवाने या घटनेत कोणतिही जिवीत हानी झाली नाही. ही आग अर्धा पाऊण तासाच्या अथक परिश्रमानंतर पूर्णपणे विझविण्यात आली, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

Story img Loader