लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटाने बेचिराख झालेल्या अमुदान कंपनी शेजारी असलेल्या असलेल्या न्यूओ ऑर्गेनिक डाईंग कंपनीला रविवारी दुपारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत डाईंगसाठी साठा करून ठेवण्यात आलेल्या पावडरच्या पिंपांना आग लागली. कंपनीतले कामगार आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचल्याने आग तातडीने नियंत्रणात आणण्यात आली.
नेटकऱ्यांनी पसरवल्या अफवा
आगीच्या या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा स्फोट असे लघुसंदेश काही उतावीळ नेटकऱ्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने काही वेळ डोंबिवलीकरांच्या पोटात गोळाच आला होता. पण ही आग कंपनीतील स्फोटामुळे नाही तर ती शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. ती तातडीने नियंत्रणात आणली गेल्याची माहितीही अग्निशमन दलाने दिली आहे.
डोंबिवलीचं ‘धगधगतं’ वास्तव; टाईमबॉम्बच्या वातीवर वसलेलं शहर!
नेमकी घटना काय घडली?
एमआयडीसी विभाग दोनमध्ये न्युओ ऑर्गेनिक डाईंग कंपनी आहे. कंपनीच्या बाहेरील महावितरणचा रोहित्रावर सकाळपासून दोन ते तीन वेळ शॉर्ट सर्किट झाले होत होते. त्यामुळे कंपनीतील वीज पुरवठा कमी जास्त होऊन, त्याचा परिणाम वीज दबाव कमी, जास्त होण्यावर होत होता. रविवारी दुपारी अशाच प्रकारे रोहित्रावर जोरदार आवाज होऊन त्याचा परिणाम कंपनीतील वीज दाब अचानक वाढला. त्यामुळे कंपनीत शॉर्ट सर्किट झाले. या उच्च दाबाने कंपनीतील वीज वाहक तारांनी तात्काळ पेट घेतला. ही आग वीज वाहिन्यांजवळ डाईंगसाठी आणलेल्या आणि साठा करून ठेवलेल्या पिंपांना लागताच पावडर असलेल्या पिंपांनी पेट घेतला. याठिकाणी काम करत असलेल्या कामगारांनी तातडीने प्रतिबंधक उपाय करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तसंच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले.आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, असे कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्सचे असोसिएशनचे माजी अध्यक्ष देवेन सोनी यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले देवेन सोनी?
एमआयडीसीतील न्यूओ ऑर्गेनिक कंपनीत स्फोट झालेला नाही. याठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून त्या लगत साठा करून डायसिंग ठेवलेले पिंप पेटले. त्यामुळे आग लागली. आग तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली आहे. आगीत जीवित हानी झालेली नाही. या आगीचे कोणीही राजकारण करू नये. असं आवाहन सोनी यांनी केलं आहे.
मागच्या महिन्यात डोंबिवलीतल्या कंपनीला आग लागली होती. तसंच त्याआधी अमूदान कंपनीत स्फोट होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. या दोन घटना ताज्या असतानाच आता या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अमुदान कंपनीच्या शेजारील कंपनीला आग लागली. त्यामुळे सुरुवातीला स्फोट झाल्याच्या अफवा पसरल्या. मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती आणि ती नियंत्रणात आणली गेली आहे.