मध्य रेल्वेच्या आसनगाव रेल्वे स्थानका जवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कसारा लोकलच्या चाकातून आग आणि धूर निघू लागल्याने सदर लोकलला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी ट्रेन मधून उड्या मारल्या. याबाबतची माहिती एका प्रवाशाने तात्काळ आसनगाव स्टेशन मास्तरांना दिली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोटरमन, गार्ड घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे तंत्रज्ञांनी आगीच्या जागेची पाहणी केली. प्लास्टिकच्या पिशवीमुळे चाकाला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. धावत्या लोकलच्या चाकाला ही पिशवी अडकली होती. चाकाच्या घर्षणाने पिशवीने पेट घेतल्याने आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे वाचा >> एअर इंडिया एकूण ८७० विमानं खरेदी करणार; कराराची किंमत लाखो कोटींमध्ये
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चाकाला लागलेली आग विझविल्यानंतर लोकल पुढे रवाना झाली. ब्रेकच्या अति घर्षणामुळे चाकाला चिकलेल्या प्लास्टिकने पेट घेतला असावा किंवा लोकलचा ब्रेक जाम झाल्याने आग लागली असावी. मात्र, या घटनेमुळे लोकल सेवा विलंबाने धावत होती, असे कल्याण – कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यात येत असून अद्याप नियंत्रण कक्षाला कोणताही अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे वाचा >> हॉलीवूडची सेक्स सिम्बॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री Raquel Welch चं निधन
प्रवाशांनी पाण्याच्या बाटल्यातून पाणी मारत आग विझवली
कल्याण- कसारा-सीएसएमटी ८.१८ वाजताच्या अतिजलद लोकलला गुरुवारी सकाळी आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ अचानक आग लागली. प्रवाशांनी केलेला ओरडा, गार्डच्या लक्षात येताच तात्काळ लोकल आसनगाव स्थानका जवळील पादचारी पुलाजवळ थांबविण्यात आली. लोकलच्या डब्या खालील चाकांमधून धूर आणि तेवढ्याच भागात आग लागली होती. आगीचे स्वरुप लहान असल्याने दोन ते तीन प्रवाशांनी धाडस करुन जवळील पाण्याच्या बाटल्यांमधील पाणी आगीवर फेकले. त्या पाण्याच्या माऱ्याने आग विझली.
आगीमुळे लोकल आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ २० मिनिट खोळंबली होती. कल्याण रेल्वे स्थानकानंतर कसारा लोकल अतिजलद लोकल म्हणून धावते. त्यामुळे या लोकलला डोंबिवली, ठाणे, घाटकोपर लोकलला प्रवाशांची तुफान गर्दी असते. कसारा लोकल उशिरा धावत असल्याने या लोकलने प्रवास करणाऱ्या कल्याण पुढील प्रवाशांनी इतर लोकलने पुढचा प्रवास करणे पसंत केले. कसारा लोकल सीएसएमटी येथे ९.४० पर्यंत पोहचते. त्यामुळे कार्यालयीन वेळेसाठी सोयीस्कर लोकल म्हणून कसारा लोकल ओळखली जाते.