डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील न्यूओ ऑरगेनिक केमिकल कंपनीतील आग प्रकरणी मानपाडा पोलिसांनी निष्काळीपणाचा ठपका ठेवत या कंपनीचे मालक, चालक आणि व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी या कंपनीत शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली होती.

मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तानाजी वाघमारे यांनी हा गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या आदेशावरून दाखल केला आहे. डोंबिवली एमआयडीसीत सोनारपाडा भागात अमुदान कंपनीच्या बाजुला न्यूओ ऑरगेनिक केमिकल कंपनी आहे. या कंपनीच्या बाहेरील रोहित्रावर सकाळपासून विजेची शाॅर्ट सर्किट होत होती. त्याचा परिणाम कंपनीतील विजेच्या प्रवाहावर होत होता. सकाळपासून सुरू असलेला हा विजेचा लपंडाव दुपारपर्यंत सुरू होता.

हेही वाचा >>>ठाण्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, महिलेचा खून झाल्याचे शव परिक्षण अहवालातून उघड

यावेळी कंपनीत उत्पादनाच्या प्रक्रिया कामगारांकडून सुरू होत्या. कंपनीत डायिंगसाठी आणलेली पावडर पिंपांमध्ये भरून साठा करून ठेवण्यात आली होती. या पिंपाच्या बाजुने कंपनीतील वीज प्रवाहाच्या वाहिन्या गेल्या होत्या. दुपारच्या वेळेत अचानक बाहेरील रोहित्रावर शाॅर्ट सर्किट झाले. त्याचा परिणाम कंपनीतील वीज पुरवठ्यावर होऊन कंपनीचा वीज दाब वाढला. यावेळी कंपनीत शाॅर्ट सर्किट होऊन आग लागली. आग पिंपात साठा करून ठेवलेल्या डाईंंगच्या पावडरला लागली. आगीच्या ज्वाला आकाशाच्या दिशेने पसरू लागल्या.

कंपनी कामगारांनी तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.कंपनीचे मालक यांनी कंपनीत कामगारांच्या सुरक्षिततेचा विचार न करता त्यांच्या जीवितेला धोका होईल, कंपनीच्या मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने, तसेच कंपनीच्या देखभालीत हलगर्जीपणा केल्याने पोलिसांनी कंपनी मालकाविरुध्द कंपनी अधिनियमाने गुन्हा दाखल केला आहे.