ठाणे : येथील बाळकूम भागात असलेल्या सहा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत रविवारी रात्री उशिरा आग लागली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेत इमारतीतील ३५-४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे जीवित हानी टळली. परंतु, ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ठाणे – भिवंडी मार्गावरील बाळकूम भागात एक सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत रविवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. ही आग मोठ्या प्रमाणात होती आणि आगीच्या धुराचे लोट सर्वत्र परिसरात पसरले होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागास मिळताच त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. कापूरबावडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा…संगीताला मुंबईसारखे प्रदूषित करू नका! ज्येष्ठ संगीतकार इलिया राजा यांचा सल्ला
आग लागल्यानंतर इमारतीत धूर पसरल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अंदाजे ३५ ते ४० रहिवाश्यांना अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षितरीत्या बाहेर काढले. रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहित आपत्ती व्यस्थापन विभागाकडून देण्यात आली.