अंबरनाथच्या आनंदनगर येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत एका रासायनिक कंपनीला बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागली. रितीक केम असे या कंपनीचे नाव आहे. याची माहिती मिळतात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरूवात केली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या रासायनिक कंपनीत सॉल्व्हंटवर प्रक्रिया केली जात होती.
अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीत रितिक केम नावाची केमिकल कंपनी असून या कंपनीत सॉल्व्हंटवर प्रक्रिया केली जाते. बुधवारी सकाळच्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुरक्षिततेचा उपाय म्हणून कंपनीतील रसायनांनी भरलेले अनेक ड्रम बाहेर काढण्यात आले. त्यामुळे आग पसरण्याचा धोका टळला आहे. मात्र आगीच्या कचाट्यात सापडलेले ड्रम विझवण्यात अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने आग लागल्यानंतर कर्मचाऱ्याने तात्काळ कंपनीबाहेर धाव घेतली. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही. मात्र या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारपर्यंत आग विझवण्याची प्रक्रिया सुरू होती.