ठाणे: शहरात लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच रविवारी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली. याच दिवशी शहरात १५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे बहुतांश ठिकाणी आग लागल्याची शक्यता ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीच्या कालावधीत मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे हवा आणि ध्वनी प्रदुषण होते. तर, काही ठिकाणी आगीच्या घटनाही घडतात. यंदा लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशी एकाच दिवाशी म्हणजेच रविवारी साजरे झाले. यानिमित्त शहरात पहाटेपासून फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. इमारतींमधील सदनिका, रस्त्यालगत असलेला कचरा तसेच झाडांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे शहरात रविवारी दिवसभरात १५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये बहुतांश ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत फटाके वाजविणाऱ्यावरून तरूणाला मारहाण

वाघबीळ, कळवा, ठाणे जिल्हा मनोरुग्णालयजवळील परिसर, पाचपाखाडी, हायलॅंड गार्डन, कचराळी तलाव, आझादनगर, रामनगर अशा ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग तात्काळ विझविली असून यामुळे या घटनांमध्ये कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती ठाणे आपत्ती विभागाकडून देण्यात आली.

कुठे घडल्या आगीच्या घटना

वाघबीळ येथील स्वस्तिक बिल्डिंग येथे कचऱ्याला आग लागली होती. कळवा येथील टाकोला मोहल्ला अन्नुड सोसायटी येथे मिटर बॅाक्सला आग लागली होती. ठाणे जिल्हा मनोरुग्णालया जवळ झाडाला आग लागण्याच्या दोन घटना घडल्या. पाचपाखाडी येथील कालिका हाईटस आणि सर्वोदर्शन टॅावर याठिकाणी कचऱ्याला आग लागली होती. हायलॅंड गार्डन येथील एका इमारतीच्या १३ व्या मजल्यावर घरातील खिडकीत ठेवण्यात आलेल्या सामानाला आग लागली होती. स्थानक परिसरातील श्रीकृष्ण पार्क येथील इमारतीच्या गच्चीवर फटाक्यामुळे ताडपत्रीला आग लागली होती.

कचराळी तलाव येथील गणपती मंदिराच्या बाजुला असलेल्या नारळाच्या झाडाला आग लागली होती. कळवा पोलीस स्थानकासमोर कचऱ्याला आग लागली होती. ब्रम्हांड येथील आझादनगर परिसरात कचऱ्याला आग लागली होती. खारेगाव येथील एका नारळाच्या झा़डाला आग लागली होती. रामनगर रस्ता क्रमांक २८ येथील कचऱ्याला आग लागली होती. भाईंदरपाडा येथील कचऱ्याला आग लागली होती. मानपाडा येथे एका कार्यालयाला आग लागली होती. तर, वृंदावन सोसायटी जवळ सुकलेल्या झाडाला आणि दिव्यात कचऱ्याला आग लागली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire incidents happened at 15 places in thane on the first day of diwali possibility of firecrackers dvr
Show comments