दोन महिन्यांत अज्ञात व्यक्तींविरोधात १३ गुन्हे
पक्षांचा महत्त्वाचा अधिवास लाभलेल्या वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर अभयारण्य सध्या आगीच्या मुखावर आहे. अभयारण्यात सतत आगी लावल्या जात असल्याने जंगल नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येथील १३ ठिकाणी आगी लागल्याचे प्रकार घडले असून अज्ञात व्यक्तींविरोधात वन विभागाने गुन्हेही दाखल केले आहेत.
अतिक्रमण करता यावे म्हणून जमीन सपाट करणे, आगीनंतर निर्माण होणारे गवत जनावरांना चारा म्हणून वापरता यावे यासाठी या आगी लावल्या जात असल्याचा अंदाज वन विभागाचा आहे. तुंगारेश्वर हे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी एकूण ४५ वन विभागाचे कमर्चारी काम करतात. आग लागल्याचे कळताच हे कमर्चारी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात या वेळी काही कर्मचाऱ्यांना दुखापत होणे असे प्रकार घडतात. फेब्रुवारीत एका आगीवर नियंत्रण मिळविताना एका कर्मचाऱ्याला सर्पदंश झाला आणि त्यास रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
तुंगारेश्वर अभयारण्य हे ९ हजार हेक्टरवर वन क्षेत्र आहे. पाणवठा, धबधबे, वृक्ष मोठय़ा प्रमाणात असल्याने यात पक्षी आणि प्राण्यांचा अधिवास आहे. यात बिबटय़ा, रानडुक्कर, जंगली प्राणी, गरुड, ससा, माकड विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट असतो. मात्र मानवी अतिक्रमण आता या पक्ष्यांना आणि निसर्गाला घातक ठरत आहे. जंगलात वणवा पेटत असल्याने प्राणी-पक्षी भयभीत होतात. तर नेमकी आग कुठे लागली आहे याचा शोध घेत वन विभाग त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न करते, परंतु तोवर आग वाऱ्यासारखी पसरत जाते आणि तो आटोक्यात आणण्यासाठी वेळ जातो. आतापर्यंत दोन महिन्यांत १३ ठिकाणी आग लागल्याने जंगल असुरक्षित झाले असेच म्हणता येईल. यात नवीन येणारी रोपे आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने होरपळून जातात त्यामुळे नव्याने वृक्ष निर्माण होत नाहीत. वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन १३ गुन्हे दोन महिन्यांत दाखल केले असून आग लावणाऱ्यांचाइसमांविरोधात तपास केला जात आहे.
वन्यजीव धोक्यात
तुंगारेश्वर अभयारण्यात साग, शिसव, खैर, ऐन, आवळा, हिरडा, बेहडा इत्यादी महत्त्वाच्या वनस्पती आहेत. तसेच बिबटे, रानडुक्कर, ससा, भेकर, मकाक आणि लंगूर यांचे अस्तित्व येथे आहे. पावशा, सर्प गरुड, महाभृंगराज, श्यामा, जंगली पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी, हळद्या यांसारखे पक्षी येथे आहेत. या लागणाऱ्या आगींमुळे यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
अशा वारंवार लागणाऱ्या आगी याकडे वन विभागाने कठोरात कठोर पाऊल उचलले पाहिजे जेणेकरून वन्यजीव तसेच निसर्गाची भरभरून असणारी तुंगारेश्वर येथील वनसंपत्ती टिकून राहील आणि मानवी अतिक्रमण रोखण्यास मदत होईल.
– सचिन राऊत, निसर्गप्रेमी
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. विशिष्ट हेतूने काही नागरिक वन विभागाच्या क्षेत्रात ठिकठिकाणी आग लावण्याचे प्रकार करतात. या घटना सध्या कमी झाल्या असून या दोन महिन्यांत १३ गुन्हे दाखल केले आहेत. जर कोणी आग लावताना निदर्शनास आले तर त्यांना वनहक्क कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– दिलीप तोंडे, वन अधिकारी