ठाणे येथील लोकमान्यनगर भागातील एका गादीच्या दुकानाला बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाल्याने दुकान मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असला तरी आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेण्याचे काम अग्निशमन विभागामार्फत सुरू आहे. विशेष म्हणजे, या भागातील अरुंद रस्ते आणि त्याठिकाणी असलेले फेरीवाले व पार्किंग करण्यात आलेली वाहने यामुळे घटनास्थळापर्यंत पोहचण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांना दिव्य प्रवास करावा लागल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
सुभाष तंगडकर यांचा गादी बनविण्याचा व्यवसाय असून त्यांचे लोकमान्यनगर येथील लाकडीपुल परिसरात रामदेव गादी भांडार नावाचे दुकान आहे. या दुकानाचे बांधकाम तळ अधिक दोन मजली असे करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या दुकानातील पहिल्या मजल्यावर आग लागली. या घटनेनंतर सुभाष यांनी दुकानातून बाहेर धाव घेतली.
दुकानात गादी, कापुस, कापड असे साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. स्थानिक रहिवाशांनी आग विझविण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला, पण आग वाढतच होती. या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र या दुकानाकडे जाणारे रस्ते अरुंद असून त्याठिकाणी फेरीवाले आणि वाहने उभी करण्यात आलेली होती. त्यामुळे घटनास्थळी पोहचण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहन चालकास तारेवरची कसरत करावी लागली. त्यातून वाट काढत अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहचले. या दुकानाच्या छप्परवर असलेले पत्रे फोडून ही आग विझविण्यात आली.एक तासांचा अवधी आग विझविण्यासाठी लागला. तसेच आगीच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आजुबाजूच्या दुकानातील सिलेंडर दुसऱ्या ठिकाणी हलविले.
अरुंद रस्ते व फेरीवाले
दुकानापर्यंत जाणारे रस्ते अरुंद असून या रस्त्यावर फेरिवाले तसेच वाहने उभी करण्यात आलेली होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहचताना मोठी कसरत करावी लागली. असे असले तरी अग्निशमन दल घटनास्थळी वेळेवर पोहचले. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या ताफ्यात असलेली एक दुचाकी वाहनाही या ठिकाणी आग विझविण्यासाठी नेण्यात आले होते, अशी माहिती ठाणे मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली.