खुंटवली भागातील २५ हजार झाडे जळून खाक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथील डोंगरावर लोकसहभागातून लावलेली झाडे आगीत भस्मसात झाल्याच्या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ कायम असतानाच अंबरनाथमधील आणखी एका डोंगरावर वृक्ष जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेतील खुंटवलीच्या डोंगरावर लागलेल्या आगीत जवळपास २५ हजार झाडे जळाल्याची माहिती मिळते आहे.

अंबरनाथच्या जावसई, खुंटवली, मांगरूळ आणि आसपासच्या परिसरांत मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. मांगरूळ आणि खुंटवलीच्या डोंगरावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यासह इतर संस्थांच्या मदतीने हजारो वृक्ष लावण्यात आले होते. मांगरूळ येथील वनक्षेत्रात लावण्यात आलेल्या झाडांना सलग दोन वर्षांत दोनदा आग लागण्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी वनमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घडामोडी ताज्या असतानाच अंबरनाथ पश्चिमेकडील खुंटवलीच्या डोंगरावर आग लागली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास खुंटवलीच्या डोंगरावर लागलेल्या या आगीत ५८ हजार झाडांपैकी जवळपास २५ हजार झाडे जळाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. या डोंगरावरील आगीची तीव्रता इतकी होती की पूर्वेतील अनेक इमारतींमधून या आगीचे लोट आणि धूर पाहता येत होते. त्यात डोंगरावर आग विझवण्याची यंत्रणा पोहोचत नसल्याने एकेक झाडाला पाणी नेऊन टाकावे लागत होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक वन विभागाचे कर्मचारी आणि शिवसैनिक घटनास्थळी पोहोचले होते. मात्र एकाच महिन्यात एकाच भागात तीन ठिकाणच्या वनक्षेत्रातील झाडांना लागलेल्या आगीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मांगरूळची घटना ताजी असतानाही वन विभागाने लक्ष न दिल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी केला.

आधारवाडी कचराभूमीला गुरुवारी आग लागल्यानंतर कल्याण परिसरात सर्वत्र धूराचे लोट उठले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठय़ा शर्थीने आग आटोक्यात आणली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire on ambarnath hill