महापालिका क्षेत्रातील इमारतींमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापनासह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेत असले तरी त्यांना अनेकदा वाहतूक कोंडीमुळे त्याठिकाणी पोहचण्यास उशीर होतो. याच काळात आग इतरत्र पसरून त्यात जिवीतहानी होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे अग्निशमन दलाने आता शहरात जनजागृती अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत गृहसंकुलांमध्ये शिबीरांचे आयोजन करून त्यात अग्निशमन दल घटनास्थळी पोहचण्यापर्यंत काय करावे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. याशिवाय, आग इतरत्र पसरू नये म्हणून इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेचा वापर कसा करावा याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या वृत्तास ठाणे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी दुजोरा दिला आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस सुरू, पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरात दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये अनधिकृत इमारती, चाळी, झोपड्या तसेच मोठी गृहसंकुले उभी राहीली आहेत. याठिकाणी आगीची घटना घडल्यास महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत त्याठिकाणी धाव घेऊन आग विझविण्यात येते. शहरात महापालिकेची नऊ अग्निशमन केंद्रे आहेत. त्यात कोपरी, पाचपखाडी, जवाहरबाग, वागळे इस्टेट, रुस्तमजी संकुल, बाळकुम, ओवळे, मुंब्रा आणि शीळ या केंद्रांचा समावेश आहे. शहराचे मोठ्याप्रमाणात नागरिकरण झाले असून त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. शहरात मेट्रोची कामे सुरु असल्यामुळे महामार्गावरील रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या कोंडीतून अग्निशमन दलाच्या जवानांना वाट काढत घटनास्थळी पोहचावे लागते. त्यामुळे काही वेळेस घटनास्थळी पोहचण्यास उशीर होतो. या कालावधीत आग इतरत्र पसरून त्यात जिवीतहानी होण्याची शक्यता अधिक असते. हि बाब लक्षात घेऊन अग्निशमन दलाने आता शहरात जनजागृती अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत गृहसंकुलांमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. गृहसंकुलांमध्ये अग्निशमन यंत्रणेची उभारणी केलेली असते. परंतु ही यंत्रणा कशी वापरायची याबाबत अनेक नागरिक अनभिज्ञ असतात. काही वेळेस अग्निशमन दलाचे जवान इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा कार्यन्वित करण्यासाठी नागरिकांकडून माहिती घेतात. परंतु ही यंत्रणा कुठून कार्यन्वित होते, हेच नागरिकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दल घटनास्थळी पोहचेपर्यंत हि यंत्रणा कशी कार्यन्वित करावी, याची माहिती आणि प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत वाघबीळ, कासारवडवली आणि पोखरण भागातील तीन संकुलांमध्ये अशी शिबीरे घेण्यात आली आहेत.