‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमातील आगीच्या पाश्र्वभूमीवर काळजी
‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमातील रंगमंचावर उसळलेल्या आगीमुळे अवघ्या काही क्षणांत रंगमंच जळून खाक झाल्याची घटना मागील आठवडय़ात मुंबईत घडली. या पाश्र्वभूमीवर ठाण्यात होत असलेल्या नाटय़संमेलनात अग्निसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी नाटय़संमेलनाच्या रंगमंचावर आवश्यक ठिकाणी ‘अग्निरोधक’ कापड वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकाराच्या कापडामुळे एखादी ठिणगी उडाली तर ती पसरण्या ऐवजी पडद्याला केवळ एक छिद्र पडते. आग रोखण्यास हे कापड उपयुक्त ठरत असून त्याचा वापर केल्याने त्याचा लाभ होणार असल्याची माहिती नाटय़संमेलनाचे कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
ठाण्यात होणारे ९६ वे अखिल भारतीय नाटय़संमेलन शुक्रवारपासून सुरू होत असून मुख्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठय़ा संख्येने नाटय़कर्मी ठाण्यात दाखल होत आहेत. ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या रसिकांसाठी भव्यदिव्य रंगमंच आणि मंडप साकारण्यात आला आहे. गेल्या आठवडय़ात मुंबईतील ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील कार्यक्रमादरम्यान लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ठाण्यातील मंडपाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. याविषयी कला दिग्दर्शक संजय धबडे यांच्याकडे विचारणा केली असतान त्यांनी रंगमंचाच्या रचनेची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली.
नाटय़संमेलनाच्या रंगमंचावर महानाटके, नाटके, कलावंत रजनी, परिसंवाद आणि वक्त्यांची भाषणे असे कार्यक्रम त्यावर होणार आहेत. त्यासाठी सुमारे ९० बाय ६० फूट लांबी रुंचीचा रंगमंच साकारण्यात आला आहे. या रंगमंचासाठी कापडा ऐवजी लाकडी प्लायवूडचा वापर मोठय़ाप्रमाणे करण्यात आला आहे. शिवाय त्यावर लावण्यात येणारे कापड हे ‘अग्निरोधक’ असणार आहे. या कापडामुळे एखादी ठिणगी उडाल्यानंतर ते भडकण्याऐवजी तिथल्या तिथे विझून जाते. त्यामुळे मोठय़ा आगीच्या घटना रोखण्यात यामुळे यश येते. या शिवाय रंगमंचाच्या तळभागात नेहमीच अंधार असतो. त्याऐवजी तेथे प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे काही घडले तर त्याची माहिती लगेच मिळू शकते, अशी व्यवस्था केली आहे.

सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी उपयुक्त रंगमंच..
अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या निमित्ताने उभारण्यात येणारा रंगमंच सगळ्या प्रकारच्या सादरीकरणासाठी उपयुक्त असणार आहे. त्यावर ‘शिवसोहळा’सारखे महानाटय़ आणि इतरही भव्य कार्यक्रम होणार आहेत. रंगभूमीच्या विंगाही भव्य केल्या असून त्यातून रंगमंचावर प्रवेश करणे सोपे होणार आहे. कलाकारांच्या वेशभूषा आणि रंगभूषा बदलण्याच्या खोल्यांची रचनाही रंगमंचाशेजारीच करण्यात आली आहे.
ठाणे आणि नाटकांचे स्नेह उलगडणारे नेपथ्य..
ठाण्यात होणाऱ्या नाटय़संमेलनात ठाण्याची छाप असून ती नाटय़संमेलनाच्या रंगमंचावरूनही दिसून येणार आहे. रंगमंचाचे नेपथ्य करत असताना त्यामध्ये रंगभूमी, ठाणे आणि महाराष्ट्राच्या विविध वैशिष्टय़ांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. ठाण्यातील वैशिष्टय़ असलेले गडकरी रंगायतनवरील किलरेस्कर, गडकरी आणि बालगंधर्वाच्या अर्धकृती पुतळ्याची प्रतीमा, तलावपाळीतील महादेवमंदिराची प्रतिमा, सिद्धिविनायक, टेंभिनाक्यावरील नवरात्रीची देवी आणि शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे या सगळ्याचा रंगमंचावरील नेपथ्यासाठी उपयोग करून घेणार आहेत.

 

Story img Loader