उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एका माथेफिरूने एका रहिवासी इमारतीवर मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांचे रॉकेट डागल्याची घटना घडली. हे रॉकेट्स थेट नागरिकांच्या घरात जाऊन फुटल्याने नागरिकांमध्ये मोठं भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली. याप्रकरणी अनोळखी तरुणाविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरात हिरापन्ना अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीवर सोमवारी पहाटे सव्वादोन ते अडीचच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरूने फटाक्यांचे रॉकेट सोडले.
इमारतीच्या बाहेर खाली हा तरुण हातात रॉकेटचा बॉक्स घेऊन उभा होता. त्यातून सुटणारे रॉकेट्स थेट नागरिकांच्या खिडकीतून घरात हा माथेफिरू सोडत होता. हे रॉकेट्स नागरिकांच्या घरात जाऊन फुटत होते. या माथेफिरूच्या साथीदाराने या घटनेची चित्रफीत तयार करून समाज माध्यमावर प्रसारित केली. या घटनेमुळे हिरापन्ना इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या अज्ञात माथेफिरूचा शोध घेत आहेत.