उच्च दाब वाहीनीला चिकटलेल्या कबुतराची सुटका करण्यासाठी गेलेला ठाणे अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला असून सुरक्षिततेची योग्य साधने पुरविलेली नसल्यामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप मनसेने केला आहे. स्मार्ट सिटीची बिरुदावली मिरवणाऱ्या ठाण्याच्या आपत्कालीन व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागत असेल, तर ती मोठी शोकांतिका असल्याचेही मनसेने म्हटले आहे.
हेही वाचा >>> ठाणे : भिवंडीत शाळकरी मुलाकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा
कोलशेत रोड येथील बायर इंडिया कंपनीजवळ असलेल्या स्ट्रीट एव्हरेस्ट गृहंकुलासमोर उच्च दाबाच्या वाहीनीला कबुतर चिकटले असून त्याचा जीव धोक्यात असल्याची माहिती बाळकुम अग्निशमन दलाला मिळाली. या कबुतराची सुटका करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला शॉक लागून तो खाली पडला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या कर्मचाऱ्यावर रूग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ठाणे अग्निशमन विभागात गेल्या काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्यावर्षी आर्यन कंपनी या ठेकेदाराच्या माध्यमातून १५० कर्मचाऱ्यांना कंत्राट पद्धतीने भरती करून घेण्यात आले. मात्र हे कर्मचारी मोठ्या घटना हाताळण्यास अकार्यक्षम असून त्यांना सहा महिन्याचे कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही, असा आरोप मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी केला आहे.
हेही वाचा >>> ठाण्यात भाजप-शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र; भाजपचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या अग्निशमन विभागात एखाद्या ठिकाणी तक्रार आल्यावर वाहन चालविण्यासाठी टीएमटीच्या चालकास सांगितले जाते. मुळात अग्निशमन विभागाचा प्रशिक्षित व्यक्ती हे वाहन चालविणे अपेक्षित असताना अग्निशमन विभागाचा गाडा कर्मचारी गोळा करून हाकला जात आहे. दहा वर्षांपूर्वी भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आधीची जुनी साधनसामुग्री वापरावी लागत आहे. तर नव्याने भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही जॅकेट, ग्लोज, बुट अशासह इतर सामुग्री पुरविण्यातच आलेली नाही. तरीही अशा कर्मचाऱ्यांना धोकादायक ठिकाणी काम करण्यासाठी पाठवले जाते. सुरक्षिततेची योग्य साधने पुरविण्यात आलेली नसल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अग्निशमन विभागाचा कर्मचारी जीवनमरणाशी झुंज देत असल्याचा आरोपही महिंद्रकर यांनी केला आहे. महापालिकेच्या अक्षम्य कारभाराची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. नागरिकांचे प्राण वाचण्यासाठी असणाऱ्या देवदूतांना मरणाच्या खाईत लोटण्याचे काम होत असल्याची प्रचिती सध्या ठाणे अग्निशमन विभागाची येत आहे. कर्मचाऱ्यांना साधने पुरवा आणि प्रशिक्षित करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.