अंबरनाथः अंबरनाथ पूर्वेतील हुतात्मा चौकाजवळील सीताई सदन इमारतीजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एकाने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांचे हे निवासस्थान असून हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे.
या गोळीबाराच्या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गोळीबार झाला त्या इमारतीच्या समोरच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यालयही आहे. तर त्यावर मंगल कार्यालयही असून अनेक मोठ्या कंपन्यांची दुकानेही याच भागात आहेत.गेल्या काही दिवसात अंबरनाथ शहरात हत्या, हल्ल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यातच सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ शहरात गोळीबाराची घटना समोर आली.
अंबरनाथ पूर्वेतील हुतात्मा चौक ते अंबरनाथ रेल्वे स्थानक रस्त्यावर असलेल्या पनवेलकर मंगल कार्यालयासमोर असलेल्या सिताई सदन या घरावर गोळीबार झाला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हुतात्मा चौकातून एका दुचाकीवर दोघेजण सिताई सदन या घरासमोर आले. घरासमोर आले असताना त्यातील दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर दोघांनी पळ काढला.
सिताई सदन हे अंबरनाथमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे निवासस्थान आहे. या ठिकाणी झालेल्या गोळीबारानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण होते. घटनेची माहिती कळताच अंबरनाथ पूर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
काळजाचा ठोका चुकला
या गोळीबाराच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य समोर आली आहेत. दुचाकीस्वार हुतात्मा चौकातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन थांबतात. त्यांच्या मागे एक रिक्षा येऊन थांबताना दिसते आहे. याच रिक्षातून एक महिला उतरते आणि काही पाऊले चालत असतानाच समोर दुचाकीवर मागे बसलेला एक व्यक्ती सिताई सदन घराच्या दिशेने अग्नीशस्त्र काढून गोळीबार करते. ही दृश्ये पाहून मागची महिला अचानक घाबरत असल्याचे दिसून येते आहे. हा गोळीबाराचा थरार पाहिल्यानंतर परिसरातील नागरिकांतही भीतीचे वातावरण होते.
वर्दळीचा भाग
अंबरनाथच्या ज्या भागात गोळीबार झाला तो अतिशय वर्दळीचा भाग समजला जातो. येथेच पनवेलकर मंगल कार्यालय हे शहरातील मोठे सभागृह आहे. येथे दररोज लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी शेकडो पाहूणे येत असतात. सोबतच याच भागात नामांकीत कंपन्यांचे कपडे, चष्मे दुकान, बॅंका, उपहारगृह, बेकरी अशी आस्थापने आहेत. त्यामुळे येथे कायमच वर्दळ असते. अशा भागात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.