कल्याण : येथील पश्चिमेतील काळा तलाव भागात मंगळवारी मध्यरात्री दोन तरुणांनी पिस्तुल मधून गोळीबार करुन, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करुन वाहनांची तोडफोड केली. या प्रकाराने काळा तलाव भागात भीतीचे वातावरण आहे.
विवेक नायडू, प्रथमेश ठमके अशी दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्याकडून गोळीबार, तोडफोड सुरू असताना काळा तलाव भागातील काही घरातील रहिवासी घराबाहेर आले, त्यावेळी या दोघांनी त्या रहिवाशांना दमदाटी आणि एका तरुणाला मारहाण केली. अर्धा तास या तरुणांचा धिंगाणा काळा तलाव भागात सुरू होता.
हेही वाचा… International Yoga Day 2023 कल्याणमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
हेही वाचा… ठाणे: चोरी प्रकरणी मोलकरीण अटकेत
पोलिसांनी सांगितले, चंदन आणि विवेक यांच्यात यापूर्वीचा वाद आहे. या वादातून विवेक, ठमके मंगळवारी मध्यरात्री काळा तलाव भागात राहत असलेल्या चंदनचा शोध घेण्यासाठी साथीदाराला घेऊन आला होता. एका तरुणाला त्यांनी चंदन कोठे राहतो असे विचारले. तरुणाने त्यास नकार देताच त्याला मारहाण करण्यात आली. या तरुणांनी हातामधील पिस्तुलमधून हवेत गोळीबार केले. रस्त्यालगत उभ्या असलेल्या रिक्षा, मोटारी यांच्यावर दगडी फेकून वाहनांची मोडतोड केली. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.