ठाणेः लोकसभेच्या अधिवेशन काळात एका चर्चेत बोलत असताना विरोधी पक्षाच्या खासदाराने दिलेल्या आव्हानावर थेट लोकसभेत हनुमान चालिसा म्हटल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चर्चेत आले होते. देशभरात त्यांच्या या हनुमान चालिसा पठणाचे कौतुक झाले. त्यानंतर मंगळवारी हनुमान चालिसाच्या निमित्ताने श्रीकांत शिंदे यांनी थेट स्वतःच्या स्वरात ध्वनिमुद्रित केलेली आणि चित्रीत केलेली हनुमान चालिसा थेट प्रकाशित केली. ऐन लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आलेला असताना प्रकाशित केलेली हनुमान चालिसा चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोनच दिवसांपूर्वी मतदारसंघात आमचं काम बोलतं या वाक्याखाली जोरदार फलकबाजी करणाऱ्या श्रीकांत शिंदे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आपल्या कार्यअहवालाचे सादरीकरण करून प्रकाश केले. त्याच्या दोनच दिवसांनी ही हनुमान चालिसा प्रसारित झाल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.

हेही वाचा – कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील वातानुकूल यंत्रणा बंद, प्रवाशांमध्ये संताप, महिलेला चक्कर

देशात राम मंदिराच्या उभारणीनंतर देशात वातावरण ढवळून निघाले. ठिकठिकाणी राम उत्सव साजरे केले गेले. ऑगस्ट २०२३ मध्ये संसदेच्या अधिवेशनात अविश्वास ठरावावर बोलताना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टिका केली होती. महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. त्यांना अटक केली जात होती असे वक्तव्य केले होते. त्याचवेळी तेथे बसलेल्या खासदार डिंपल यादव यांनी तुम्हाला हनुमान चालिसा येते का, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट हनुमान चालिसाच सभागृहात बोलून दाखवली होती. त्यावेळी भाजपसह सर्व सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्यांना जोरदार समर्थन दिले होते.

देशभरात संसदेत हनुमान चालिसा म्हणणारा खासदार म्हणून श्रीकांत शिंदेंची नवी ओळख बनली. आपली हीच ओळख आणखी ठसठशीत करण्यासाठी आता चक्क श्रीकांत शिंदे यांनी आपल्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेली आणि चित्रीत केलेली हनुमान चालिसाच प्रसारीत केली आहे. मंगळवारी सकाळी हनुमान जयंतीच्या निमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे यांनी या हनुमान चालिसेची चित्रफीत आपल्या समाजमाध्यम खात्यावरून प्रसारीत केली. यात श्रीकांत शिंदे स्वतः हनुमानाच्या मूर्तीसमोर हनुमान चालिसा गाताना दिसत आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात असताना खासदार शिंदे यांच्या या हनुमान चालिसा चित्रफितीमुळे चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा

देशात धार्मिक स्थळांच्या पुनर्विकास आणि सुशोभीकरण तसेच सण, उत्सव आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकारणाचे ध्रुवीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाटचाल करताना दिसतात. त्याचे पुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही मोदींचाच हाच पॅटर्न मतदारसंघात राबवला. अंबरनाथ येथील शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण असो, येथे आयोजित केला जाणारा शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल असो की गेल्या तीन ते चार महिन्यात आयोजीत करण्यात आलेले श्रीराम उत्सव, श्रीनिवास बालाजी कल्याण महोत्सव, किर्तन महोत्सव या माध्यमातून मतांची पेरणी करताना दिसले. उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, स्थानिक आगरी कोळी आणि वारकरी बांधव यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजनही त्यांनी केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First hanuman chalisa in parliament now live video special video post by mp shrikant shinde on hanuman jayanti ssb